संजय राऊत : अजित पवार, शिंदे गट भाजपमध्ये जाणार…

Photo of author

By Sandhya

संजय राऊत

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची साथ ज्यांनी सोडली, त्यांचा पराभव निश्चित आहे. महाराष्ट्र या गद्दारांना कदापी स्वीकारणार नाही, असा पुनरुच्चार करत धनुष्यबाण-घड्याळ चिन्हांवर गद्दार निवडून येणार नाहीत.

केवळ छगन भुजबळच नव्हे, तर अजित पवार व शिंदे गटाचे आमदार, खासदार भाजपमध्ये प्रवेश करून कमळ चिन्हावर निवडणूक लढवतील, असा दावा शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

पक्षीय बैठकांच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर आलेल्या खा. राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिंदे, पवार गटांसह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरही जोरदार निशाणा साधला.

मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी इगतपुरीतील सभेत छगन भुजबळ हे भविष्यात भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा केला होता. जरांगे यांच्या या विधानाला राऊत यांनी दुजोरा दिला. अजित पवार गटाचे बहुतेक आमदार, खासदार हे भविष्यात भाजपमध्ये प्रवेश करतील.

जर भाजपने त्यांना उमेदवारी दिली, तर ते कमळ चिन्हावर निवडणूक लढवतील, असा दावा राऊत यांनी केला. विधानसभा अध्यक्षांच्या दिल्लीभेटीविषयी विचारले असता राऊत म्हणाले की, त्यांना सातत्याने दिल्लीला जावे लागणार, कारण निर्णय काय द्यायचा, याचा दिल्लीतून आदेश घेतल्यानंतरच ते सुनावणी करतील.

संविधानानुसार सर्व काही पार पडले असते, तर सर्व फुटीर आमदार आतापर्यंत घरी बसले असते, असे नमूद करत विधानसभा अध्यक्षांचा आम्ही नेहमी आदर केला आहे; परंतु, ही व्यक्ती लायक नाही. नार्वेकर यांना आपण विधानसभा अध्यक्ष मानत नाही, अशी टीकाही राऊत यांनी केली.

राऊत यांना वेड्याची उपमा देणाऱ्या भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचाही त्यांनी समाचार घेतला. आम्ही आमच्या पक्षाची भूमिका मांडतो. या राज्यात लूट सुरू आहे यावर आवाज उठवत आहोत. याला तुम्ही वेडेपणा म्हणत असाल, तर आम्ही आहोत वेडे, अशा शब्दांत राऊत यांनी पलटवार केला.

तुमचे ना महाराष्ट्राशी संबंध, ना छत्रपतींशी, तुमचा संबंध खोक्याशी आणि तुमच्या पक्षाचे अध्यक्ष मकाऊवरून कर्तबगारी करून आलेत का? असा प्रतिसवालही त्यांनी महाजनांना उद्देशून केला.

मुंबई क्रिकेटची पंढरी होती, ती कुठे गेली, वेदांता फॉक्सन कुठे गेला, डायमंड मार्केट कुठे गेला, हे जर राज्याच्या उद्योगमंत्र्यांना माहीत नसेल, तर हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याची टीका त्यांनी उदय सामंत यांना उद्देशून केली.

शिंदे अमेरिका, फ्रान्समध्येही प्रचाराला जातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या राजस्थानच्या निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी गेले आहेत. त्यावरही राऊत यांनी टिकास्त्र डागले. एकनाथ शिंदे हे मजबूत नेते आहेत.

राजस्थानच काय, तर पुढच्या वर्षी अमेरिका आणि फ्रान्स मध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या प्रचारालाही ते जातील, असा टोला त्यांनी लगावला. आधी महापालिकेच्या निवडणुका घ्या, मग राजस्थानात प्रचाराला जा, अशा शब्दांत राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना चिमटा काढला.

Leave a Comment