शरद पवार यांनी आज दुष्काळी स्थितीवर भाष्य करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाण्याच्या टंचाईमुळे चिंताजनक स्थिती आहे.. आपल्याकडे सर्वात जास्त धरणे आहेत. पण, या धरणाची अवस्था अत्यंत वाईट आहे.
संभाजीनगरमध्ये १० टक्के पाणी आहे. पुणे विभागात ३५ धरणं आहेत तिथे १६ टक्के पाणीसाठा आहे. नाशिकमध्ये २२ धरणे आहेत तिथे २२ टक्के पाणी आहे. कोकणात २९ टक्के पाणी आहे, अशी माहिती पवारांनी दिली आहे.
उजनी धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठी शून्य आहे. मराठवाड्यातील जायकवाडी धरणात ५ टक्के पाठीसाठा आहे, माजलगावमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे. मांजरा धरणात अर्धा टक्का सुद्धा पाणी नाही. धाराशिव जिल्हात शून्य टक्के पाणीसाठा आहे. अहमदनगरमध्ये ९ टक्के पाणीसाठा आहे, असं पवार म्हणाले.
मे महिन्याच्या शेवटाकडे आपण आहोत, पण जूलैपर्यंत हीच स्थिती असणार आहे. पाऊस पडतो, पण धरणं भरण्यासाठी वेळ लागतो. संभाजीनगरमध्ये १८६७ टँकर लागत आहेत.
वेळीच लक्ष दिलं नाही तर स्थिती गंभीर होईल. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. पुण्यामध्ये ६३२ गाव आणि वाड्यामध्ये ७५५ टँकर सध्या लागत आहेत, असं पवार म्हणाले.
राज्यात यंदा १०, ५७२ टँकर लागत आहेत, मागील वर्षी १,१०८ टँकर लागत होते. यावरुन स्थितीचे गांभीर्य लक्षात येईल. जनावरांच्या चाऱ्याची आवश्यकता आहे. राज्यात अनेक ठिकाणी चारा छावण्यांची मागणी करण्यात येत आहे.
संभाजीनगर आणि पुण्यामध्ये दुष्काळी काम काढणं, किंवा रोजगार हमीचे कामं काढणं आवश्यक आहे, असं शरद पवार यांनी सूचवलं आहे. राज्याची स्थिती गंभीर असून सरकारचे त्याकडे लक्ष नसल्याची टीका पवारांनी केली आहे.