
देशातील साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती इथेनॉलच्या विक्रीमुळे सुधारण्यास मदत झाली. ऊस उत्पादक शेतक-यांना पैसे दिले गेले. आता साखर कारखान्यांनी त्यांचे कामकाज स्थिर व आर्थिकदृष्ट्या अधिक व्यवहार्य बनविण्यासाठी कॉम्प्रेसड बायो गॅस (सीबीजी) प्रकल्पांची उभारणी करायला हवी, अशी अपेक्षा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार येथे व्यक्त केली.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची (व्हीएसआय) ची 47 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पवार यांच्या अध्यक्षतेखाली मांजरी येथील मुख्यालयात झाली. यावेळी सन 2022-23 मधील व्हीएसआयच्या विविध पुरस्काराचे वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी व्यासपीठावर व्हीएसआयचे उपाध्यक्ष व सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पांडुरंग पाटील, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार विश्वजीत कदम, आमदार रोहित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी कै. वसंतदादा पाटील ’सर्वोत्कृष्ट’ साखर कारखाना पुरस्कार’ हा कोल्हापूर जिल्ह्यातील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास प्रदान करण्यात आला. मानचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि 2 लाख 51 हजार रुपये रोख असे त्याचे स्वरूप आहे.
तसेच कै. कर्मयोगी शंकररावजी पाटील सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार हा दौंड तालुक्यातील दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कारखान्यास देण्यात आला. व्हीएसआयच्या आतापर्यंतच्या सर्वच सर्वसाधारण सभेस कायमच अजित पवार हे उपस्थित असतात. यावेळी मात्र त्यांनी या कार्यक्रमास येणे टाळले.