उपमुख्यमंत्री अजित पवार : राज्यात अनेक वाचाळवीर, त्यांना रोज सकाळी काहीतरी बोलावेच लागते…

Photo of author

By Sandhya

उपमुख्यमंत्री अजित पवार

मी उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असतो त्यानुसारच बोलत असतो. त्यामुळे कोण काय बोलले याच्याशी माझे काही घेणे देणे नाही. राज्यात असे अनेक वाचाळवीर असून त्यांना रोज सकाळी काहीतरी बोलावेच लागते, अन्यथा त्यांना झोप येत नसल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. तसेच त्यांना उत्तर देण्याचे काम प्रत्येक पक्षाचे प्रवक्ते करत असतात, असेही ते यावेळी म्हणाले.

राज्यस्तरीय नियोजन समितीची आढावा बैठक उपमुख्यमंत्री तसेच वित्त मंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात पुणे विभागातील जिल्ह्यांची आढावा बैठक झाली, बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयावर गुरुवारी त्यांना विचारले असता, पवार म्हणाले, जे न्यायाधीश असतात त्यांच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता असते, अशांनी दिलेला निकाल आपण मान्य करायचा असतो असे सांगून नार्वेकर यांच्या निकालाचे समर्थनच केले.

यानंतर तुम्ही मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले का असे विचारले असता, आम्ही सरकारातच आहोत. सरकार सुरूच आहे त्यामुळे त्यांचे अभिनंदन केव्हा करण्याचे मी ठरवेल, मात्र तुम्ही पत्रकारांनी मला फुकटचे सल्ले द्यायचे नाही म्हणत चांगलेच भडकले.

कात्रज येथील डेअरीच्या मैदानावर आरक्षण टाकण्यासंदर्भात निर्माण झालेल्या वादावर विचारले असता अजित पवार यांनी महापालिका आयुक्त सध्या शहरात नसल्याने त्यांच्याशी बोलून नंतर सांगेल असेही स्पष्टीकरण दिले.

जीएसटीचा निधी देण्याचे मान्य… जीएसटी कौन्सिलकडून राज्यांना प्रत्येक वर्षीची रक्कम केंद्राकडून देण्यात आली असून आता केवळ पाच ते सहा हजार कोटी रुपये बाकी आहेत. केंद्राने तेही देण्याचे मान्य केले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.

पोलिस अधिकार्‍यांना योग्य निर्देश देणार गुंड शरद मोहोळ याचा खून झाल्यानंतर पुण्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे का, धनकवडी परिसरात लागलेल्या फ्लेक्स विषयी पालकमंत्री म्हणून तुम्ही काय करणार या प्रश्नावर पवार म्हणाले, मी पुणे व पिंपरीच्या पोलिस आयुक्त तसेच जिल्हा पोलिस अधीक्षकांची यासंदर्भात चर्चा करून त्यांना योग्य ते निर्देश देईल.

कोणताही राजकीय पदाधिकारी आपापल्या राज्यात कायदा व सुव्यवस्था चांगली राहील यासाठीच प्रयत्न करत असतो. आम्ही देखील त्या दृष्टीने प्रयत्न करू. 

Leave a Comment