बारामती तालुक्यात तीन दिवसांपूर्वी युगेंद्र पवार यांना अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारला होता. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी आता आमदार रोहित पवार व युगेंद्र पवार यांना तत्काळ सुरक्षा द्यावी अशी मागणी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.
सुळे यांनी यासंबंधी जिल्हा पोलिस अधीक्षकांना पत्र दिले आहे. पत्रात नमूद केल्यानुसार लोकसभा निवडणूक प्रचारार्थ आमदार रोहित पवार व युगेंद्र पवार हे दौरे करत आहेत.
संविधानिक पद्धतीने, शांतपणे व लोकशाही मार्गाने लोकांशी सुसंवाद साधत आहेत. परंतु काही ठिकाणी त्यांना दडपशाहीचा सामना करावा लागत आहे.
काही लोक घेराव घालून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनांमुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून जीविताला धोका आहे. पुणे जिल्ह्यात हे अपेक्षित नाही.
त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन त्यांना सुरक्षा प्रदान करावी, असे सुळे यांनी पत्रात म्हटले आहे. जाब मला विचारा प्रचाराच्या निमित्ताने यंदा युगेंद्र पहिल्यांदाच बाहेर पडला आहे. त्याला घेराव घालण्याचे कारण काय असा सवाल सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
ज्यांना कोणाला काही जाब विचारायचा असेल तर त्यांनी मला विचारावा. निवडणूक मी लढते आहे. युगेंद्रच्या बाबतीत जे घडले ते चुकीचे आहे. पोलिसांकडून काही इनपुटस मला आले. त्यामुळे मलाही चिंता वाटली म्हणून मी पोलिसांना पत्र दिल्याचे सुळे यांनी सांगितले.