सुप्रिया सुळे : “सुधीर मुनगंटीवारांवर PM नरेंद्र मोदींनी कारवाई करायला हवी”…

Photo of author

By Sandhya

सुप्रिया सुळें

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आता प्रचार, सभा यांच्यावर भर दिला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपाचे नेते, स्टार प्रचारक विविध ठिकाणी रॅली, सभा घेताना दिसत आहेत.

पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या महाराष्ट्रात सभा होणार आहेत. अलीकडेच पंतप्रधान मोदी यांनी भाजपा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. या सभेत सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या एका विधानावरून विरोधकांकडून टीकास्त्र सोडले जात आहे.

सुधीर मुनगंटीवार यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विधानाचा निषेध केला. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, त्यामुळे नागरिक म्हणून मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या पक्षाचे नेते सुधीर मुनंगटीवार यांच्यावर कारवाई करायला हवी.

मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमध्ये बोलताना अतिशय गलिच्छ असे विधान केले आहे. खरे तर राजकारण होत राहील, पण महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे. हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

ट्रिपल इंजिन खोके सरकार अतिशय असंवेदनशीलपणे वागत आहे डिसेंबर महिन्यापासून सातत्याने राज्यातील दुष्काळाची परिस्थिती, शेतकरी, शेतमजुरांच्या अडचणी तसेच अंगणवाडी सेविकांच्या अडचणींचा मुद्दा मांडत आहे.

संपूर्ण राज्यात जेमतेम ३५ टक्के पाणी शिल्लक आहे. बारामतीचे उदाहरण द्यायचे झाल्यास, उजनी आणि नाजरा धरणात एक थेंब पाणी नाही. हे पाणी पुढचे अडीच महिने पुरेल की नाही हे सांगता येत नाही, अशी गंभीर परिस्थिती असताना राज्यातील ट्रिपल इंजिनचे खोके सरकार अतिशय असंवेदनशीलपणे वागत आहे.

हे सरकार केवळ पक्ष फोडा, धमक्या द्या, यातच व्यस्त आहे. त्यांना दुष्काळावर उपाय करण्यासाठी वेळच नाही, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.  दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विधानांवरून विरोधकांच्या महाविकास आघाडीतील नेत्यांनी सडकून टीका केली आहे.

Leave a Comment