जगज्जेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या मिरवणुकीसाठी गुजरातहून बस मागविण्यात आली. ज्याचे पडसाद विधान परिषदेत आणि विधानसभेतही उमटलेले पाहण्यास मिळाले. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जाते आहे.
महाराष्ट्र सरकार गुजरातधार्जिणे आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. मुंबईत होणाऱ्या मिरवणुकीसाठी गुजरातहून बस आणून एकप्रकारे महाराष्ट्राचा अपमान करण्यात आला आहे, अशी टीका त्यांनी केली. शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांनीही गुजरातहून बस मागवली गेल्याने टीका केली आहे.
सुप्रिया सुळे यांनी काय म्हटलं आहे? तसंच आता याबाबत खासदार सुप्रिया सुळेंनीही भाष्य केलं आहे. मुंबईत बस असताना, बेस्ट वगैरे सगळं काही असताना गुजरातहून बस का मागवण्यात आली? याचं उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारच देऊ शकतील असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
त्यामुळे आता प्रश्न चांगलाच चर्चेत आला आहे. विधान परिषदेतही अनिल परब आणि भाई जगताप यांनी या बसचा मुद्दा उपस्थित केला. ज्यानंतर प्रवीण दरेकर यांनी हे उत्तर दिलं की तु्म्ही सगळे विरोधक हे कोत्या मनोवृत्तीचे आहात. दरेकरांच्या या वाक्यानंतर विधान परिषदेत गदारोळ झाला.
लाडकी बहीण योजनेवरही सुप्रिया सुळेंचं भाष्य मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याबाबत मी माहिती घेतली. मी त्या योजनेचा अभ्यासही केला. १५०० रुपये या योजनेतून महिलांना मिळणार आहे. १५०० रुपयांमध्ये किती रेशन येतं? याबाबत मी अभ्यास केला.
१५०० रुपये देणार आहेत ठीक आहे आम्ही स्वागत करतो. पण इतक्या तुटपुंज्या पैशांमध्ये भगिनींना किती दिलासा मिळणार आहे? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळेंनी विचारला. सध्या राज्यात महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार असे प्रश्न आहेत.
१५०० रुपयांमध्ये काय येतं जरा माझ्याबरोबर चला- १५०० रुपयांमध्ये काय किराणा भरता येणार आहे? डाळींचे भाव कडाडले आहेत, पीठ महागलंय. किराणा मालाच्या दुकानात माझ्याबरोबर चला. महिन्याभराचं वाणसामान किंवा भाजी याला १५०० रुपये पुरतात का? ते बघावं असं आवाहनच सरकारला सुप्रिया सुळेंनी केलं आहे.
राज्यासमोर भ्रष्टाचार, महागाई आणि बेरोजगारी हे महत्त्वाचे प्रश्न आहेत असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. तसंच नंतर गुजरातच्या बसवरुनही टोला लगावला.
गुजरातहून बस का आणली ते मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रीच सांगू शकतील- टीम इंडियाच्या स्वागतासाठीची बस गुजरातमधून का आणली? मुंबईतली बस का नव्हती? याचं उत्तर मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रीच देऊ शकतील. सध्या अधिवेशन सुरु आहे, त्यामध्ये त्यांनी उत्तर दिलं पाहिजे असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
तसंच सुषमा अंधारेंबाबत जे विधान झालं त्यावरही सुप्रिया सुळेंनी भाष्य केलं. महिलांचा अपमान हे सातत्याने महायुतीचे नेते करत असतात. महिला पुढे आल्या की त्यांचा द्वेष करायचा हेच त्यांना माहीत आहे. सातत्याने महिलांबाबत ज्या कमेंट येतात त्यात सातत्य दिसतं आहे. असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.