सुषमा अंधारे : शेतकर्‍यांना भरीव मदत द्या; अन्यथा आंदोलन

Photo of author

By Sandhya

सुषमा अंधारे

सातगाव पठार (ता. आंबेगाव) येथे अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांना सरकारने भरीव मदत द्यावी; अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिला.

सातगाव पठार भागात गेल्या आठवड्यात गारपीट आणि अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नुकसानग्रस्त भागातील शेती पिकांच्या नुकसानीचा पाहणी दौरा केला आणि त्यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधला.

या वेळी उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोर, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम, शिवसेनेचे संघटक राजाराम बाणखेले, उपजिल्हा प्रमुख दिलीप पवळे, उपतालुकाप्रमुख भरत मोरे, ग्राहक संरक्षण कक्ष उपजिल्हाप्रमुख हेमंत एरंडे, मंचर शहराध्यक्ष विकास जाधव, अरुणनाना बाणखेले, नंदकुमार बोर्‍हाडे, अनिल निघोट यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

या वेळी नुकसानग्रस्त भागातील शेतकर्‍यांनी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीचा पाढा वाचला. विशेष म्हणजे सातगाव पठार हा दुष्काळी भाग असून केवळ पावसावरच येथे शेती अवलंबून आहे.

त्यामुळे ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावरच गारपिटीने कांदा, लसूण, गहू, बटाटा इत्यादी पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. याबाबत सरकारने भरीव मदत केली पाहिजे, अशी अपेक्षा शेतकर्‍यांनी व्यक्त केली.

शेतकर्‍यांशी संवाद साधताना सुषमा अंधारे यांनी शेतकर्‍यांच्या पाठीशी शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि पक्ष आहे. नुकसानभरपाई देण्यासाठी टाळाटाळ किंवा कमी प्रमाणात भरपाई देण्याचा प्रयत्न सरकारने केल्यास सरकारच्या विरोधात आंदोलन केले जाईल आणि शेतकर्‍यांना केंद्रस्थानी मानून भरघोस मदत देण्यासाठी सरकारला भाग पडू, असे आश्वासन दिले. 

Leave a Comment