सुषमा अंधारे : ललित पाटीलला मंत्री भुसे यांनी मातोश्रीवर नेले 

Photo of author

By Sandhya

सुषमा अंधारे

ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणाचे दोन भाग असून, ससून हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यानंतरचा भाग जगासमोर आला आहे. पण ललितचा ड्रग्ज माफियापर्यंतचा प्रवास समोर येणे बाकी आहे. या प्रकरणी गृहखात्याने सखोल तपास करून दाेषींवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली.

पक्षाम‌ध्ये ललितकडे कोणतीच जबाबदारी नसल्याचा दावा करताना, मंत्री दादा भुसे यांनीच त्याला मातोश्रीवर नेल्याचा गौप्यस्फोट अंधारेंनी केला. येथे सोमवारी (दि. ११) महाप्रबोधन यात्रेनिमित्त आलेल्या अंधारे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शालिमार येथील शिवसेना भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेवेळी त्या म्हणाल्या, माताेश्रीवर कोणाला जायचे झाल्यास पक्षाचा जिल्हाप्रमुख गेटपास देताे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमवेतच्या फोटोत मंत्री भुसेदेखील असून, ललितला तेथे नेण्यात त्यांचाच पुढाकार असल्याचा आरोप अंधारे यांनी केली. तसेच कोट्यवधींच्या ड्रग्ज कारखाना प्रकरणात जागा करार, परवाने, कागदपत्रे व मालाच्या वाहतुकी संदर्भात प्रशासनाला काहीच माहिती नव्हती का? असा प्रश्न अंधारे यांनी मंत्री भुसे यांना केला.

अशी कोणतीच माहिती नसल्यास पालकमंत्री म्हणून आपण सपशेल अपयशी ठरला आहात, असा टोलादेखील त्यांनी भुसे यांना लगावला. ललित पाटील प्रकरणामध्ये पुण्याबरोबर नाशिकमधील छोटी भाभी व इरफान शेखवर कारवाई झाली.

पण नाशिकच्या मोठ्या भाभीवर कारवाई झालेली नाही. या प्रकरणात नाशिक, पुणे, भिवंडी, जळगाव व मुलूंड येथील ४० नावे समोर येत असल्याचा दावाही अंधारेंनी केला. ससूनमध्ये नऊ महिने उपचार घेणाऱ्या ललितला असा कोणता आजार आहे, असा मुद्दा उपस्थित करत गरोदर महिलाही नऊ महिने रुग्णालयात दाखल होत नाहीत. त्यामुळे ससूनचे डीन संजीव ठाकूर यांची नार्को टेस्टची मागणी अंधारे यांनी केली.

अंधारे म्हणाल्या, -गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सुरक्षित नाही, ते आम्हाला काय सुरक्षा देणार? -अधिवेशनावेळी सभागृह व बाहेर संघर्ष उभारणार. -अधिवेशनात ड्रग्ज, शेतकरी मदत, आरक्षण आदी मुद्दे मांडणार. -लोकांच्या प्रश्नांबाबत मविआतील तिन्ही पक्षांचे स्वतंत्र दौरे सुरू. -जागा वाटपाचा मुद्दा यथावकाश सोडवणार. -भाजपकडून गावगाड्याची विण उसविण्याचा प्रयत्न. -मराठा-ओबीसी वादाला भाजपच जबाबदार.– -गावपातळीवर सर्वच समाजांची विण घट्ट.——– -मंत्री नारायण राणे यांची मुले बिनबुडाचे आरोप करतात.

Leave a Comment