सुषमा अंधारेंचा दादा भुसेंवर गंभीर आरोप

Photo of author

By Sandhya

राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांचे नाव ससून रुग्णालयातून पळून गेलेला आरोपी ललित पाटील याला राजकीय वरदहस्त दिल्याप्रकरणी येत असून, याप्रकरणी गृह खात्याने चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली.

त्या म्हणाल्या की, ससून रुग्णालयातील घटनेत एका आमदाराचा हात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल नाशिकमध्ये बोलताना केला होता.

काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे गटातील एका मंत्र्याचा हात असल्याचे म्हटले आहे. या दोन गोष्टी एकत्रित करून पाहिल्यास नाशिकमध्ये शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे हेच आहेत. त्यामुळे त्यांच्या चौकशीची मागणी मी केली आहे. ललित पाटील हा देखील नाशिकचाच आहे.

भुसे यांचे फोन कॉल रेकॉर्डिंग गृह विभागाने तपासून पाहावेत. अंधारे म्हणाल्या की, राजकीय वरदहस्त असल्याशिवाय ललित पाटील नऊ महिने ससून रुग्णालयात पडून राहू शकत नाही.

कितीही दुर्धर आजार असला, तरी नऊ महिने रुग्णालयात राहावे लागत नाही. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करून घेताना ससून रुग्णालयात किंवा अधिष्ठाताच्या मोबाईलवर कोणाचे फोन आले होते.

ते आधीचे ससूनचे अधिष्ठाता काळे आणि विद्यमान अधिष्ठाता ठाकूर यांच्याकडे विचारले पाहिले. ललित पाटील याला काय आजार होता, त्याच्यावर कोणते उपचार सुरू होते, ते ससूनच्या अधिष्ठाता यांनी सांगून शंकेचे निरसन केले पाहिजे.

राज्याची आरोग्यव्यवस्था व्हेंटिलेटरवर असल्याचे नमूद करीत अंधारे म्हणाल्या की, आता प्रश्न गृह खात्याविषयी उपस्थित झाले आहेत. दादा भुसे हे चौकशीसाठी तयार आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत उत्तर दिले पाहिजे.

नांदेड येथील घटना गंभीर असून, राज्याचे आरोग्यमंत्री जबाबदारी त्यांची नसल्याचे सांगतात. मनपा बरखास्त असल्यामुळे तेथील प्रशासनाची जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यामुळे आरोग्यमंत्री यांना जबाबदारी टाळता येणार नाही.

आरोग्य संचालक आणि जबाबदार अधिकार्‍यांच्या 73 टक्के जागा रिक्त आहेत. हा?किन 226 कोटीचे बिल बाकी होते. नांदेडला औषधे उपलब्ध नव्हती. अतिरिक्त रक्तस्रावामुळे तीन बाळंतीण महिलांचा मृत्यू झाला. त्यांच्यासाठी कॉटन बंडलदेखील नव्हते. त्यामुळे या सर्वांची चौकशी झाली पाहिजे

Leave a Comment