
पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबत अजित पवार आधीपासून आग्रही होते आणि त्यांना पालकमंत्रीपद देणे हे आधीच ठरले होते. मंत्रीपद बदलणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अधिकार आहे. जे ठरलं होतं तेच घडलेलं आहे. अजित पवार कधीही नाराज नव्हते. ते स्पष्ट वक्ते आहेत.
त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या वक्तव्याविषयी कोणीही वेगळा अर्थ काढू नये असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. सातारा येथील कनिष्क मंगल कार्यालयात सातारा, वाई, कोरेगाव येथील तीनशे कार्यकर्त्यांची प्रशिक्षण कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती.
त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. श्री. बावनकुळे पुढे म्हणाले, महायुतीमध्ये भाजपच्या आमदारांची संख्या जास्त आहे.
या नात्याने गेल्या नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी जी कामे केली, त्याची स्वतंत्र पुस्तिका छापून आम्ही वॉरियर्सच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवण्याचे काम सुरू केले आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये साताऱ्याचा लोकसभेचा उमेदवार हा पार्लमेंटरी बोर्डाकडून ठरवला जाईल व तो भाजपचा की घटक पक्षाचा याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे पार्लमेंटरी बोर्ड बसून निर्णय घेणार आहे.
आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री असावा असे सर्वांनाच वाटत असते. त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री व्हावा अशी आमची अपेक्षा असणे गैर नाही. मंडल प्रमुख आणि बूथ प्रमुखांच्या माध्यमातून पक्षाचा कार्यक्रम व्यवस्थितपणे राबवण्याचे काम सुरू आहे.
मात्र इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी जनतेला गोंधळात टाकण्याचे काम केले आहे. डीएमके नेता स्टॅलिन यांनी हिंदू धर्म नष्ट करण्याची भाषा वापरली आहे. हे इंडिया आघाडीचे नेते शरद पवार, नाना पटोले यांना मान्य आहे काय? असा सवाल बावनकुळे यांनी केला.
एकनाथ शिंदे दमदार मुख्यमंत्री मुख्यमंत्री हे महायुती आघाडीचे दमदार मुख्यमंत्री असून योग्य तो निर्णय ते घेतील. 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात बोलताना बावनकुळे म्हणाले, तुम्हा पत्रकारांचा असा प्रश्न असेल तर मी स्वतः तुम्हाला मुंबईला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे घेऊन जातो.
तुम्ही तो प्रश्न त्यांनाच विचारा. मात्र आगामी 2024 च्या निवडणुकांपर्यंत महायुती सरकारचे एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री आहेत, असे बावनकुळे यांनी ठामपणे सांगितले.
45 खासदारांचे उद्दिष्ट महाराष्ट्रात 45 खासदार निवडून आणण्याचे उदिष्ट आहे. सातारा लोकसभेसाठी सुध्दा योग्य वेळ आल्यानंतर तुम्हाला बदल दिसून येतील असे ते म्हणाले.
बुधवारी राज्य सरकारने नऊ जिल्ह्याचे पालकमंत्री जाहीर केले. नऊ जिल्ह्याचे नऊ नव्याने पालकमंत्री आल्यामुळे सरकारचा परफॉर्मन्स वाढला आहे. ज्या जिल्ह्यांना पालकमंत्री नव्हते त्यांना ते मिळाल्यामुळे त्या जिल्ह्यांच्या विकासाला मदत होणार आहे.
पालकमंत्री नेमले गेले, याचा कोणीही राजकीय अर्थ काढू नये असे आवाहन त्यांनी केले. गेल्या 48 तासांमध्ये नांदेड आणि औरंगाबाद येथे सरकारी आरोग्य यंत्रणेच्या अनास्थेमुळे जे बळी गेले,
त्या संदर्भात बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले, सरकारी आरोग्य यंत्रणेवर स्वतः मुख्यमंत्री काम करत आहेत. या संदर्भात माहिती घेतली जात आहे. आरोग्य विषयक पायाभूत सुविधा कशा दिल्या जातील याविषयीचा आराखडा करण्याचे काम सुरू आहे.