
भांडगाव येथे तीन आरोपींकडून तीन गावठी पिस्तुले, १५ जिवंत काडतुसे जप्त; बलेनो कारसह ५.३७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
यवत (ता. दौंड) : पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि यवत पोलीस ठाण्याने संयुक्त कारवाई करत भांडगाव परिसरातून तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तीन अवैध गावठी पिस्तुले, १५ जिवंत काडतुसे आणि एक बलेनो चारचाकी वाहन असा एकूण ५ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा (कोल्हापूर परिक्षेत्र) यांनी अवैध अग्निशस्त्र बाळगणारे व त्यांचा वापर करून गुन्हे करणाऱ्या आरोपींविरुद्ध विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि सर्व पोलीस ठाण्यांना प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ७ जुलै २०२६ रोजी यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना गोपनीय माहिती मिळाली. भांडगाव येथील सोनाक्षी मंगल कार्यालयासमोरील परिसरात नंबर नसलेल्या पांढऱ्या रंगाच्या बलेनो कारमध्ये तीन जण अवैध गावठी पिस्तुलांसह येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचे नियोजन करण्यात आले.
त्यानंतर दोन पंचांच्या उपस्थितीत स्थानिक गुन्हे शाखा आणि यवत पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तपणे सापळा रचून संशयित बलेनो कार अडवली. वाहनाची आणि तिघांची कायदेशीर झडती घेतली असता प्रत्येकाकडे एक-एक असे तीन गावठी पिस्तुले आणि १५ जिवंत काडतुसे आढळून आली. तसेच वापरातील बलेनो कारही जप्त करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मंगेश शंकर मासोळे (वय २४), सुरज संजय शेलार (वय २६) आणि रोहित प्रेमदास भुजवणे (वय २४), सर्व रा. यवत, ता. दौंड, जि. पुणे अशी आहेत.
या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६९२/२०२६ दाखल करण्यात आला असून संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींनी ही अवैध गावठी पिस्तुले कोठून आणली, ती कोणाकडून खरेदी केली आणि त्यामागील नेमका उद्देश काय होता, याचा सखोल तपास सुरू आहे. अटक आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि यवत पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने संयुक्तपणे पार पाडली.