Saswad’s water supply to become regular as Garade Dam fills up… Grand preparations underway for the Palkhi procession.

Photo of author

By Sandhya

गराडे धरण भरल्याने सासवडचा पाणीपुरवठा होणार नियमित… पालखी सोहळ्याची जय्यत तयारी

सासवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गराडे धरणामध्ये गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात ७० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा मा. आनंदीकाकी चंदुकाका जगताप यांच्या हस्ते धरणाचे पूजन करण्यात आले. या पावसामुळे सासवडकरांची गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेली पाणीटंचाई दूर होणार असून, पाणीपुरवठा पुन्हा नियमित ‘आडदिवसाआड’ करण्यात येणार आहे.

​श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सासवड नगरपरिषदेने युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. पालखी सोहळ्यासाठी जादा पाणीपुरवठा केला जाणार आहे. शहरातील सर्व हातपंप दुरुस्त केले जात असून, टँकरसाठी खाजगी विहिरींची व्यवस्था करण्यात आली आहे. या विहिरींचे शुद्धीकरण व क्लोरीनेशन करण्यात येत असून, टँकर भरण्यासाठी २४ तास कर्मचारी नियुक्त केले आहेत. पालखी तळावरील नळकोंडाळी सुस्थितीत करण्यात आली आहेत.

सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करण्यात आली आहे. ‘निर्मलवारी’ अंतर्गत २००० मोबाईल टॉयलेटची शहरात विविध ठिकाणी सोय करण्यात आली आहे. तसेच, स्टॉलधारकांना कचरा व्यवस्थापनासाठी डस्टबीन बॅगा पुरवल्या जाणार आहेत.

चंदनटेकडी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी, तर जेजुरी नाका येथे श्री संत सोपानकाका महाराज आणि श्री संत चांगावटेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या निरोपासाठी विशेष कक्ष उभारले आहेत.

पालखी तळाची स्वच्छता व सपाटीकरण पूर्ण झाले असून खडीकरण करण्यात आले आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात आले असून, पालखी मार्गावरील राडारोडा उचलण्याचे आदेश संबंधित मालकांना देण्यात आले आहेत.

​पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने नगरपरिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांवर जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या असून, सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे, अशी माहिती उपनगराध्यक्ष मनोहर जगताप, गटनेते अजित जगताप, पाणीपुरवठा सभापती ज्ञानेश्वर गिरमे, आरोग्य सभापती राजन जगताप आणि बांधकाम सभापती ज्ञानेश्वर जगताप यांनी दिली.

Leave a Comment

You cannot copy content of this page