उपमुख्यमंत्री अजित पवार : देहू, आळंदी, पंढरपूर तीर्थक्षेत्र परिसरात अत्याधुनिक बसस्थानक, उभारण्याचे निर्देश…

Photo of author

By Sandhya

उपमुख्यमंत्री अजित पवार

पिंपरी चिंचवड शहर परिसरात देहू आणि आळंदी या तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे. येथे होणारी कोंडी सोडविण्यासाठी देहू-आळंदी-पंढरपूर तीर्थक्षेत्र परिसरात अत्याधुनिक बसस्थानक बांधण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेड-आळंदी मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत मंत्रालयातील त्यांच्या दालनात आढावा बैठक घेतली. या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे (रस्ते) सचिव सदाशिव साळुंखे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन शर्मा, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

त्या वेळी राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र परिसरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी देहू-आळंदी-पंढरपूर तीर्थक्षेत्र परिसरात अत्याधुनिक बसस्थानक बांधून त्याच्यावर रॅम्पची सुविधा असलेले वाहनतळ उभारण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, तीर्थक्षेत्र आळंदी येथे आषाढी वारीसह वर्षभर मोठ्या प्रमाणात भाविक येतात. आलेल्या भाविकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी पुरेशा वाहनतळाची व्यवस्था उपलब्ध असणे आवश्यक आहे.

एसटी बसस्थानकांच्या इमारतीवर रॅम्पच्या सुविधेसह पार्किंग उभारण्याचा प्रस्ताव तयार करावा. शिवाय या आराखड्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग सुविधेचाही समावेश करावा.

तसेच बसस्थानक परिसरातील रस्त्यांसाठी एसटी महामंडळाची ६५२ चौरस मीटर जागा प्रस्तावित आहे. त्यासाठी एसटीला जागेच्या मोबदल्याची रक्कम जिल्हा नियोजन समितीमधून देऊन जागा नगरपालिकेला हस्तांतरित करावी, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment