चंद्रपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र टोंगे यांनी जिल्हाधिकारी कार्यलयासमोर अन्नत्याग आंदोलन केले होते. आज (शनिवार) या आंदोलनाची सांगता झाली.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविंद्र टोंगे यांनी लिंबू पाणी पिवून आंदोलन मागे घेतले. चंद्रपुरात 11 सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र टोंगे यांनी मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात येऊ नये,
राज्यामध्ये बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे करण्यात यावा तसेच प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरू करण्यात यावे या मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेतृत्वात अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.
त्यांची प्रकृती खालावल्या नंतर विजय बल्की यांनी आंदोलन सुरू ठेवले. काल (शुक्रवार) (29 सप्टेंबर) ला मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहावर राज्यातील ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये ओबीसींच्या सर्व मागण्या तत्वतः मान्य करून तोडगा काढण्यात आला.
त्यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आंदोलन मागे घेण्यावर सहमती दर्शविली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (शनिवार) चंद्रपुरात दाखल झाले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 23 दिवसांपासून उपोषणावर बसलेले राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र टोंगे यांना लिंबू पाणी पाजून अन्नत्याग आंदोलनाची सांगता केली.
यावेळी वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, आमदार किर्तिकुमार भांगडिया, परिणय फुके, ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे, सचिन राजुरकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.