उपमुख्यमंत्री पवार यांचे विद्युत उपकेंद्रांसाठी आराखडा तयार करावा, असे निर्देश

Photo of author

By Sandhya

उपमुख्यमंत्री पवार

हिंजवडी (फेज-3) 400 केव्ही वितरण वाहिनी, 220 केव्ही उर्से ते चिंचवड वाहिनी, 220 केव्ही खेड सिटी आणि 220 केव्ही चिंचवड ते हिंजवडी वाहिनी या कामांना गती द्यावी.

2030 पर्यंत स्थानिक वीजेची मागणी लक्षात घेऊन सुधारित वितरण क्षेत्र योजनेअंतर्गत उपकेंद्रांसाठी आराखडा तयार करावा, असे निर्देश उपमुख्यंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

अजित पवार यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे पुणे जिल्हा व पुणे शहरामधील विद्युत पुरवठ्याच्या विविध योजना व इतर प्रश्नांबाबत महावितरण आणि महापारेषण अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्या वेळी त्यांनी विद्युत पारेषण वाहिन्यांच्या कामांना गती देण्याचे निर्देश दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जेजुरी – हिंजवडी (फेज-3) 400 केव्ही वितरण वाहिनी, 220 केव्ही उर्से ते चिंचवड वाहिनी, 220 केव्ही खेड सिटी आणि 220 केव्ही चिंचवड ते हिंजवडी वाहिनी तसेच पुणे जीआयएस पॉवर ग्रीड मल्टी सर्किट तळेगाव वाहिनीबाबत यावेळी आढावा घेतला.

विद्युत पारेषण वाहिन्यांना गती देताना कामाला विरोध करणाऱ्यांशी संवाद साधावा आणि आवश्‍यक तेथे पोलीस संरक्षण घेऊन काम सुरू करावे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सुधारित वितरण क्षेत्र योजनेंतर्गत शेतकऱ्यांची मागणी लक्षात घ्यावी. जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यांमधील वीजेची गरज लक्षात घ्यावी.

कृषी धोरण 2020 अंतर्गत कामे दर्जेदार करावीत, त्यासाठी आवश्‍यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विद्युत सुविधांसाठी 100 कोटी रुपये देण्यात येतील.

Leave a Comment