ड्रग्ज प्रकरणात पालकमंत्र्यांसह पोलिसांचाही सहभाग; संजय राऊत यांचा आरोप

Photo of author

By Sandhya

 संजय राऊत

गुजरातमधून नाशिकमध्ये एमडी ड्रग्ज येत असून, नाशिकचे आजी-माजी पालकमंत्री, आमदार आणि पोलिसही या ड्रग्जमाफियांच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा घणाघाती आरोप खासदार संजय राऊत यांनी केला.

नाशिकला ड्रग्जच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी शिवसेनेने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. ड्रग्जमाफियांना पोसणाऱ्यांना इशारा देण्यासाठी दि. २० ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे, अशी माहितीही खा. राऊत यांनी यावेळी दिली.

गेल्या दोन दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर असलेल्या खा. राऊत यांनी शुक्रवारी (दि. १३) माध्यमांशी संवाद साधला. नाशिकमधील एमडी ड्रग्ज प्रकरणाविषयी चिंता व्यक्त करताना ते म्हणाले की, धार्मिक, सुसंस्कृत ओळख असलेले नाशिक हे गेल्या काही दिवसांपासून देशभरात ड्रग्ज प्रकरणाने गाजत आहे, हे शोभनीय नाही.

पंजाब, गुजरातनंतर आता ‘उडते नाशिक’ होते की काय, अशी शंका येत आहे. गुजरातमधून सुरतमार्गे ड्रग्ज नाशिकमध्ये आणले जात असून, नाशिक ड्रग्जमाफिया आणि गुंडांचा अड्डा बनू पाहात आहे.

शहरासह जिल्ह्यात रौलेट जुगार, कुत्ता गोलीचा वापर केला जात आहे. राजकीय पाठबळाशिवाय नाशकात इतका मोठा प्रकार सुरू असणे शक्य नाही, असा आरोपही त्यांनी केला.

या आंदोलनात सहभागी होणे ही प्रत्येक नाशिककराची जबाबदारी आहे. हा प्रश्न राजकीय नव्हे, तर सामाजिक आहे. त्यामुळे २० ऑक्टोबरला होणाऱ्या विराट मोर्चात सर्व नाशिककरांनी, संस्था, संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही राऊत यांनी केले.

Leave a Comment