
जळगांव जिल्ह्यातील चाळीसगांव हे विविध कारणांनी प्रसिद्ध आहे . येथील हजरत पिर मुसा कादरी बाबांचा ऊरुसही असाच हिंदू – मुस्लीम ऐक्याचं प्रतिक म्हणून प्रसिद्ध आहे . दि . १६ जानेवारी रोजी येथे ७२८ वा ऊरूस साजरा करण्यात आला . या उरुसाचे वैशिष्टय म्हणजे ही तलवार शरीफची मिरवणूक हिंदू कुटुंबातून निघते आणि संदल मुस्लीम कुटूंबातून निघतो . या दोन्ही मिरवणूका वाजतगाजत दर्ग्यावर येऊन मिळतात . तलवार पकडण्याचा मान देशमुख घराण्याकडे असतो . यावेळी हा तलवार पकडण्याचा मान भालचंद्र देशमुख यांच्या कुटुंबातील मोहीत देशमुख यांना मिळाला तर धुनी पकडण्याचा मान सार्थक देशमुख यांना मिळाला . ही परंपरा तब्बल गेली ७२८ वर्षे चालू आहे . तर या उरुसाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक तलवारीच्या दर्शनासाठी येत असतात . यावेळी चाळीसगांव पोलीसांनी कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवल्याचे दिसून आले . तसेच या कार्यक्रमासाठी आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार राजीव देशमुख, जिल्हा बँक संचालक प्रदीप देशमुख, डॉ . नरेश देशमुख, नगरसेवक रामचंद्र , हाजी गफूर पठाण, दर्गा ट्रस्टी जमील मुजावर, बशीर मुजावर, फकीरा मुजावर, शेख अल्लाउद्दीन, पप्पू राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते . सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ॲडिशनल एस . पी . कविता नेरकर, डि वाय एस पी राजेशसिंह चंदेल, पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, यांच्या एस आर पी एफच्या तुकडीने पार पाडली .