नांदेड : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंघ बादल यांच्यावर नांदेडमध्ये जीवघेणा हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. शहरालगत असलेल्या माता साहिब गुरुद्वाराचे दर्शन करून ते खाली परत येत असताना पायऱ्यावर थांबलेल्या एका वृद्ध निहंगसिंघने बादल यांच्यावर किरपाने हल्ला केला. हाताला दुखापत झाल्याने ते जखमी झाले.
दरम्यान, पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले असून जसपालसिंघ (वय ६२) असे त्याच नाव आहे. धक्कादायक म्हणजे सुखबीरसिंघ यांना जीवे मारण्याचा हल्लेखोराचा उद्देश होता. मात्र, नांदेड पोलिसांनी तत्परता दाखवल्याने मोठी घटना टळली. त्याने हल्ला का केला? याचा तपास पोलीस करीत आहेत. विशेष म्हणजे झेड प्लस सुरक्षा असताना देखील हा हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे.
आरोपी हल्ल्यानंतर आय एम सरेंडर असं ओरडला
दुसरीकडे हल्ला केल्यानंतर आरोपी हा आय एम सरेंडर… असं ओरडत होता, असे प्रत्यक्षदर्शनीने सांगितले. दरम्यान, या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून सुखबीरसिंघ बादल यांच्या प्रकृतीबाबत विचारणा केली.
नेमकं काय घडलं?
माजी उपमुख्यमंत्री तथा शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंघ बादल हे बुधवारी आपल्या संपूर्ण कुटुंबियासह नांदेडच्या सचखंड गुरुद्वाराच्या दर्शनासाठी आले होते. सचखंड गुरुद्वाराचे दर्शन घेतल्यानंत्तर गुरुवारी दुपारी ते आपल्या कुटुंबियांसह मुदखेड तालुक्यातील माता साहिब गुरुद्वारा येथे गेले होते.
आरोपीचा सुखबीरसिंघ यांच्या छातीवर वार करण्याचा प्रयत्न
दर्शन करून खाली आल्यानंतर पायऱ्यावर जसपालसिंघ हा हात जोडत थांबला होता. यावेळी त्याच्या हातात मोठा रुमाल होता आणि त्याने रुमालमध्ये किरपान लपवले होते. हात जोडत असल्याने सुखबीरसिंघ त्याच्या जवळ गेले त्यानंतर हल्लेखोराने किरपाने छातीवर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बादल यांनी वार चुकवला आणि छातीवरील वार हातावर झेलला.
पोलीस निरीक्षक जखमी
यावेळी बचाव करताना पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे हे देखील जखमी झाले. नांदेड पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला पकडले. यावेळी आरोपी सरेंडर सरेंडर…असे ओरडत होता. घटनेनंतर गुरुद्वारामध्ये काही वेळ तणाव निर्माण झाला होता. तातडीने बादल यांना नांदेडच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आरोपी पुण्याचा रहिवासी
आरोपी जसपालसिंघ हा पुणे येथील रहिवासी आहे. दोन वर्षापूर्वी घर सोडून नांदेडच्या गुरुद्वारामध्ये सेवादार म्हणून कामाला होता. गुरुद्वारामध्ये तो सेवा देखील करायचा शिवाय तो इथं एकटाच राहत होता. पुण्यामध्ये त्याचे संपूर्ण कुटुंब आहे. त्याचे शिक्षण बीकॉम आणि एलएलबी झालेल आहे. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी अजून समोर आलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.
