Headlines

वीरपत्नी श्रीमती सविता विजय राजपुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण; १०० विद्यार्थिनींच्या स्वप्नांना मिळाली ‘Two Wheels of Hope’ची साथ

KUMSS संस्थेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; शौर्य, त्याग, शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचा प्रेरणादायी संगम

काऱ्हाटी – कृषि उद्योग मूल शिक्षण संस्था (KUMSS),काऱ्हाटी येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात विविध उपक्रमांसह साजरा करण्यात आला.यावेळी वीरपत्नी श्रीमती सविता विजय राजपुरे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री.दशरथदादा धुमाळ होते.

देशाच्या रक्षणासाठी आपल्या पतींनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाची साक्षीदार असलेल्या वीरपत्नींच्या हस्ते तिरंगा फडकविण्याचा हा क्षण उपस्थितांसाठी अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी ठरला.वीर जवानांच्या त्यागाला अभिवादन करताना विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा आणि कर्तव्यभावनेची प्रेरणा निर्माण झाली.

स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे १०० विद्यार्थिनींना सायकल वाटप संस्थेच्या अध्यक्षा तथा महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री मा.श्रीमती सुनेत्रावहिनीसाहेब अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या ‘Two Wheels of Hope’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले.

ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थिनींना शिक्षणासाठी दररोज लांबचा प्रवास करावा लागतो. प्रवासाची अडचण,वेळेचा अपव्यय आणि वाहतुकीची मर्यादित साधने यामुळे त्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये,तसेच मुलींच्या शिक्षणाला गती,आत्मविश्वास आणि स्वावलंबनाची दिशा मिळावी,या उदात्त हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.

सायकल ही केवळ प्रवासाचे साधन नसून एका विद्यार्थिनीच्या शिक्षणाच्या स्वप्नांना गती देणारी आणि तिच्या उज्ज्वल भविष्यातील वाटचालीला दिशा देणारी ‘आशेची दोन चाके’ आहेत, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

यावेळी संस्थेचे विश्वस्त मा.श्री. दत्तात्रय वाबळे,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विकास संजय निर्मल,संस्थेच्या विविध विभागांचे प्राचार्य,उपप्राचार्य,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,तसेच विद्यार्थी,पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते,सांस्कृतिक कार्यक्रम,भाषणे तसेच विविध उपक्रम सादर करून स्वातंत्र्य दिनाचा उत्साह द्विगुणित केला. विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचा इतिहास, स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान आणि राष्ट्रनिर्मितीतील युवकांची भूमिका याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींना शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचे भविष्य घडविण्याचे आवाहन केले. “मुलगी शिकली,स्वावलंबी झाली आणि सक्षम झाली तर कुटुंब,समाज आणि राष्ट्राची प्रगती अधिक वेगाने होते,” या विचारातून मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात आले.

संस्थेच्या वतीने सांगण्यात आले की,स्वातंत्र्याचा हा उत्सव हा प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची समान संधी आणि प्रत्येक मुलीला स्वावलंबनाची संधी उपलब्ध करून देणारा ठरायला हवा आणि याच सामाजिक बांधिलकीतून KUMSS संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक, कौशल्य विकास आणि सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.

वीरपत्नी श्रीमती सविता राजपुरे यांच्या हस्ते झालेले ध्वजारोहण आणि ‘Two Wheels of Hope’ अंतर्गत १०० विद्यार्थिनींना झालेले सायकल वाटप यामुळे यंदाचा स्वातंत्र्य दिन शौर्य,त्याग,शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचा प्रेरणादायी संगम ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *