शिक्षणाचा प्रसार आणि पीपल्सच्या परिवर्तनाचे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू- अण्णा बनसोडे



पीपल्स एज्युकेशन संस्थेच्या विश्वस्तपदी नियुक्ती झाल्यानंतर महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष तथा पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे यांनी आज मुंबई येथील सिद्धार्थ कॉलेजला भेट देत विश्वस्तपदाचा पदभार स्वीकारला.
यावेळी अण्णा बनसोडे यांनी पीपल्स एज्युकेशन संस्थेच्या विविध शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाची माहिती घेतली. तसेच संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक सुविधांची पाहणी करून महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी, अपेक्षा आणि भविष्यातील संधी याबाबत त्यांनी आस्थेने चर्चा केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारातून उभ्या राहिलेल्या पीपल्स एज्युकेशन संस्थेच्या माध्यमातून समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सुरू आहे. या कार्याला अधिक बळ देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे अण्णा बनसोडे यांनी यावेळी सांगितले.
“शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. पीपल्स एज्युकेशन संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रसार आणि सामाजिक परिवर्तनाचे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक त्या सुविधा आणि संधी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले जाईल,” असा विश्वास अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षणाचा वसा पुढे नेत असतांना संस्थेच्या वाढीसाठी शासनाकडून सर्वोत्तपरीने सहकार्य कसे होईल यासाठी प्रयत्न असेल असे ही बनसोडे म्हणाले.यावेळी संस्थेतील पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
