यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोरीपार्धी येथे पोलिसांनी कारवाई करत 41 किलो 18 ग्रॅम गांजा जप्त केला असून, याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत गांजासह स्विफ्ट डिझायर कार असा एकूण 25 लाख 50 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई 4 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास बोरीपार्धी गावच्या हद्दीत सुपा–केडगाव चौफुला रस्त्यावर श्री दत्त मंगल कार्यालयाजवळ करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षवर्धन अशोक बरडे (वय 29, सध्या रा. काळेपडळ, हडपसर, मूळ रा. रायगाव, ता. करमाळा) आणि कुशाल दत्तात्रय बिनवडे (वय 30, सध्या रा. काळेपडळ, हडपसर, मूळ रा. वंजारवाडी, ता. करमाळा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपींकडून दोन पोत्यांमध्ये प्लास्टिकच्या चिकटपट्टीने गुंडाळलेली एकूण 20 बंडले आढळून आली. त्यामध्ये हिरवट-काळसर रंगाचा बियाबोंडे व भुग्यासह गांजा होता. पहिल्या पोत्यातून 20 किलो 500 ग्रॅम, तर दुसऱ्या पोत्यातून 20 किलो 518 ग्रॅम, असा एकूण 41 किलो 18 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. त्याची अंदाजे किंमत 20 लाख 50 हजार 900 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तसेच आरोपींच्या ताब्यातील एमएच 12 डब्ल्यूएक्स 6505 क्रमांकाची पांढऱ्या रंगाची मारुती स्विफ्ट डिझायर कार, अंदाजे पाच लाख रुपये किमतीची, पोलिसांनी जप्त केली.
याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 1011/2026 अन्वये NDPS Act कलम 20(ब) II(क), 8(क), 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास सपोनि गाढवे करीत असून, गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोहेकॉ/2052 शिंदे यांनी केली आहे. महसूल व अंमली पदार्थविरोधी कारवाईच्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे.
चौफुला येथे 41 किलो गांजासह दोघांना अटक; 25 लाखांचा मुद्देमाल जप्तयवत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
