शिक्रापूर पोलिसांनी केला बीडमधून आरोपी जेरबंद; ४.५० लाखाचे तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत
आधी गोड बोलून विश्वास जिंकला…नंतर सोन्याच्या बिस्कीटाचे आमिष दाखवले…आणि संधी साधून तीन तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. मात्र, सीसीटीव्हीच्या नजरेतून चोरटा सुटला नाही. शिक्रापूर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत थेट बीड गाठले आणि फसवणूक करणाऱ्या आरोपीला जेरबंद केले. त्याच्याकडून महिलेचे तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले.
अभिमान बाबू तुपे (वय ४९, रा.पिठ्ठी निरगुडी, ता.पाटोदा, जि.बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. करंदी येथील नंदा गणपत दरेकर (वय ५२) या २८ सप्टेंबर रोजी नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी खंडाळे येथे जात होत्या. शिक्रापूरच्या चाकण चौकात वाहनाची वाट पाहत असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्याशी गोड बोलण्यास सुरुवात केली. बोलता बोलता त्याने त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांना आपल्या मागे येण्यास सांगितले.
दरेकर यांना चाकण चौकातून तळेगाव ढमढेरे रस्त्यावरील सुपर बाजाराजवळील झाडाखाली नेण्यात आले. तेथे बोलण्याच्या ओघात त्यांच्या हातातील दोन सोन्याच्या बांगड्या कट करून आणि गळ्यातील सोन्याची पानपोत काढून घेण्यात आली. त्यानंतर आरोपीने त्यांच्या हातात सोन्यासारखे दिसणारे पितळेचे बिस्कीट ठेवले आणि ‘हे तुमच्या सोन्यापेक्षा जास्त वजनाचे आहे,’ असे सांगितले. आरोपी तेथून निघून गेल्यानंतर दरेकर यांनी बिस्कीट पाहिले. ते सोन्याचे नसल्याचे लक्षात येताच आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी दुसऱ्या दिवशी शिक्रापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. फुटेजमधून आरोपीचा माग काढत पोलिस पथक बीड जिल्ह्यात पोहोचले आणि अभिमान तुपे याला ताब्यात घेऊन अटक केली. आणखी एक आरोपी निष्पन्न झाला असून त्याचाही शोध सुरू आहे. आरोपीकडून दोन सोन्याच्या बांगड्या आणि एक सोन्याची पानपोत असे तीन तोळे सोन्याचे दागिने पूर्णपणे हस्तगत करण्यात आले आहेत. त्यामुळे फसवणुकीच्या या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी चोरीचा मुद्देमालही परत मिळवला आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलिस अधीक्षक शुभम कुमार व शिरूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस फौजदार लहानु बांगर, पोलिस हवालदार बापू हाडगळे, विश्वंभर वाघमारे व शिवाजी चितारे यांच्या पथकाने केली.
महिलेचा विश्वास संपादन करून तीन तोळे सोने लंपास केल्यानंतर आरोपीने पोलिसांना चकवा देत बीड गाठले. मात्र, चाकण चौकापासूनच्या सीसीटीव्ही फुटेजने आरोपीचा माग काढला. शिक्रापूर पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित करत बीडमध्ये धडक दिली आणि आरोपीला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून महिलेचे तीन तोळे सोन्याचे दागिनेही हस्तगत करण्यात आले.
