Headlines

आयुष्यात पुढे जाण्यासाठी स्पोर्ट्स कल्चर फार महत्त्वाचे

• सिंधुताई सपकाळ यांच्या लेकींशी कृष्णराज महाडिक यांचा फेस टू फेस संवाद“

• ममता बाल सदन संस्थेला दिली सदिच्छा भेट

सासवड (प्रातिनिधि) : मुलींनो स्वतःला कधीच कमजोर समजू नका. कारण आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कर्तृत्व सिद्ध करू लागल्या आहेत. जर तुमच्या “लाईफमध्ये अप-डाऊन आले तर स्पोर्ट्समधून प्रेरणा मिळते. स्पोर्ट असे क्षेत्र आहे की जे तुम्हाला कायम स्फूर्ती आणि प्रेरणा देत राहील ज्यामुळे तुमच्यामध्ये शिस्त निर्माण होईल. मी स्वतः स्पोर्ट्समधून पुढे आलेलो आहे. त्यामुळे आयुष्यात पुढे जाण्यासाठी स्पोर्ट्स कल्चर फार महत्त्वाचे ठरते, असा विश्वास भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी व्यक्त केला.
पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ माईंच्या मायेने आणि संस्कारांनी उभ्या राहिलेल्या ममता बाल सदन (बालगृह), कुंभारवळण येथे भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी सदिच्छा भेट देऊन माईंच्या लेकींशी फेस-टू-फेस मनमोकळा संवाद साधला. मुलींनीही क्रीडा क्षेत्र, करिअर आणि भविष्यातील संधींबाबत उत्सुकतेने संवाद साधला. यावेळी क्रीडा क्षेत्रातील आपले अनुभव मुलींसमोर मांडले. शिक्षण, रोजगार, स्वावलंबन, सुरक्षितता, करिअर आणि जीवनातील अडचणींपासून ते मनाच्या तळातून आलेल्या प्रश्नांपर्यंत मुलींनी अनेक प्रश्न महाडिक यांच्यासमोर मोकळेपणाने मांडले. यावेळी मुलींशी संवाद साधताना कृष्णराज महाडिक म्हणाले, “काही प्रश्न शिक्षणाचे असतील… काही रोजगाराचे असतील… काही स्वावलंबनाचे असतील… काही मुलींच्या सुरक्षिततेचे असतील… तर कदाचित एखादा प्रश्न अगदी मनाच्या तळातून आलेला असेल. कुठलाही प्रश्न असो, आपण मला मनमोकळेपणाने विचारा. मी आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन.”“तुमच्यासारख्या मुलींच्या स्वप्नांना समाजाची साथ कशी मिळेल?” या प्रश्नाचे उत्तर केवळ शब्दांत नव्हे, तर संवादातून आणि संवेदनशीलतेतून मिळायला हवे, अशी भावना व्यक्त करत त्यांनी माईंच्या सर्व लेकींना आवाहन केले, “मनातला प्रश्न मनात ठेवू नका… आज मनमोकळेपणाने विचारा! कारण माईंच्या घरात प्रश्न विचारण्यासाठी परवानगी लागत नाही; इथे प्रश्न मायेने ऐकले जातात आणि उत्तरांना आधाराची जोड दिली जाते.”या आवाहनानंतर मुलींनीही मनातील अनेक प्रश्न थेट महाडिक यांच्यासमोर मांडले.
महाडिक यांनी मुलींच्या प्रत्येक प्रश्नाला मनापासून आणि समर्पक उत्तरे देत त्यांच्या जिज्ञासेला प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाच्या प्रारंभी पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ माईंच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ममता बाल सदनचे अध्यक्ष दीपक गायकवाड यांच्या हस्ते कृष्णराज महाडिक यांचा शाल, श्रीफळ तसेच पिंपळ व तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमानंतर महाडिक यांनी ममता बाल सदन परिसराची पाहणी केली. त्यांनी संस्थेची गोशाळा आणि बेकरी यांना भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली. माईंच्या कार्यातून उभ्या राहिलेल्या विविध उपक्रमांची त्यांनी आस्थेने पाहणी केली. यावेळी पुणे व सासवड परिसरातील भाजपचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास अधीक्षिका स्मिता पानसरे, संचालक गोपाल गायकवाड, प्रसन्न गायकवाड, संजय गायकवाड, सुजाता गायकवाड, सरपंच मंजुषा गायकवाड, नाना कुंभारकर यांच्यासह ममता बाल सदनमधील मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी मुकेश चौधरी यांनी केले.

चौकट
असे विचारले प्रश्न ?
“एक चांगला नेता होण्यासाठी अभ्यास, वक्तृत्व, धाडस आणि संवेदनशीलता यापैकी कोणत्या गुणाला आपण सर्वाधिक महत्त्व देता?”, “अनाथ किंवा वंचित मुलांना समाजात समान संधी मिळण्यासाठी युवकांनी कोणती भूमिका बजावली पाहिजे?”, “आपल्या आई-वडिलांकडून मिळालेला असा कोणता संस्कार आहे, जो आपण आयुष्यभर जपता?”, “ग्रामीण भागातील मुलींना उच्च शिक्षण आणि चांगल्या करिअरच्या संधी मिळाव्यात यासाठी शासन आणि समाजाने आणखी काय करायला हवे?”, तसेच “महाराष्ट्रभर प्रवास करताना युवकांच्या कोणत्या प्रश्नाने आपल्याला सर्वाधिक विचार करायला लावले?” असे विविध प्रश्न मुलींनी विचारले. मुलींच्या प्रश्नांना सुद्धा त्यांनी तितकीच दिलखुलास उत्तरे दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *