- आयटीआयमध्ये पेटकेअरसाठी विशेष अभ्यासक्रम सुरू होणार



‘पेटकेअर एज्युकेशन अँड ट्रेनिंग इकोसिस्टिम’ (पीईटीई) हा पेटकेअर आणि प्राणी कल्याणाच्या क्षेत्रात उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. पाळीव प्राणी हे आज आपल्या कुटुंबाचा अविभाज्य भाग झाले आहेत. एखाद्या समाजाची संवेदनशीलता त्या समाजातील प्राण्यांशी तो कसा वागतो, यावरूनही दिसून येते. पीईटीईच्या माध्यमातून आपल्या पाळीव प्राण्यांना जागतिक दर्जाची सेवा आणि काळजी मिळण्यासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ तयार होण्यास मदत होईल. या नव्या प्रवासासाठी मी पीईटीई टीमचे अभिनंदन करतो आणि या उपक्रमासाठी शक्य ती सर्व मदत करण्यास कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.
पुण्यातील जे. एम. रोड येथे सोमवारी या पेटकेअर शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचा शुभारंभ मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आला. पेटकेअर क्षेत्रातील भावी व्यावसायिकांसाठी मुंबईतील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथे प्रायोगिक स्वरूपाचा विशेष प्रशिक्षण उपक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव मंत्री लोढा यांनी मांडला.
पीईटीईच्या माध्यमातून पाळीव प्राण्यांची काळजी, आरोग्य, सुरक्षितता आणि कल्याण यांना केंद्रस्थानी ठेवून आधुनिक, शास्त्रीय आणि नैतिक पद्धतींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. पेटकेअर क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे युवक-युवती, विद्यमान पेट प्रोफेशनल्स तसेच पेट पॅरेंट्स यांच्यासाठी विविध शासकीय मान्यताप्राप्त प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
पेट हँडलिंग, डॉग वॉकिंग, पेट सिटिंग, पेट ग्रुमिंग, बोर्डिंग सुविधा व्यवस्थापन आदी प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच प्रात्यक्षिक प्रशिक्षणावर जास्त भर दिला असून यात अद्यावत सुविधांमध्ये प्रत्यक्ष अनुभवावर आधारित प्रशिक्षण दिले जाईल. पेट पॅरंट्ससाठी पाळीव प्राण्यांचे सर्वांगीण आरोग्य, संगोपण व कल्याण यावर आधारित ऑनलाईल अभ्यासक्रमाद्वारे शिकवले जाणार आहे.
यावेळी पीईटीईचे संचालक पार्थ जोशी म्हणाले की, पेटकेअर क्षेत्राचा झपाट्याने विस्तार होत असताना प्रशिक्षित, संवेदनशील आणि प्रमाणित व्यावसायिकांची गरज मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच सखोल वैज्ञानिक अभ्यास आणि उद्योगक्षेत्राच्या गरजांचा विचार करून पीईटीईचा अभ्यासक्रम विकसित करण्यात आला आहे. प्रत्यक्ष प्रशिक्षणावर भर देत भावी प्राणीसेवकांना सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे पीईटीईचे संस्थापक भाग्येश रानडे यांनी सांगितले.
तसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांच्या प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला. पेटकेअर क्षेत्रातील वाढती मागणी लक्षात घेऊन पीईटीईकडून पेट ग्रूमिंग, डॉग वॉकिंग, पेट सिटिंग, बोर्डिंग आणि इतर संबंधित क्षेत्रांतील कुशल मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. आगामी पाच वर्षांत पीईटीईचा विस्तार देशभर करण्याचे संस्थेचे उद्दिष्ट असून, पाळीव प्राण्यांचे जीवनमान तसेच त्यांची काळजी घेणाऱ्या व्यक्तींच्या कौशल्यात आणि व्यावसायिक क्षमतेत सकारात्मक बदल घडवून आणण्याचा संस्थेचा मानस आहे.
