Headlines

सामाजिक बांधीलकी जपत ॲड.रेणुकाताई चलवादी यांनी साजरा केला वाढदिवस

विद्यार्थी, स्वछता दूतांसोबत साधला संवाद

वाढदिवसाचा चकचकाट आणि अवाजवी खर्च टाळून समाजातील वंचित, गरजवंत आणि उपेक्षित घटकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे हाच खरा वाढदिवसाचा आनंद असतो, याचा आदर्श वस्तुपाठ दाखवून दिला आहे पुणे इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या उपाध्यक्षा, लोकनेत्या ॲड. रेणुकाताई चलवादी यांनी. आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांनी पुणे शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून सामाजिक बांधीलकी जपली.

दिवसाची सुरुवात त्यांनी ‘बालग्राम’ मधील निरागस मुलांसोबत केली. मुलांच्या सहवासात वेळ घालवत त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून रेणुकाताई भावूक झाल्या. याप्रसंगी संस्थेला स्वच्छतेसाठी लागणाऱ्या साहित्याचे वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर सी. आर. रंगनाथन शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नधान्याची मदत सुपूर्द करत त्यांनी मुलांशी आपुलकीचा संवाद साधला.

आपले शहर स्वच्छ ठेवणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत प्रभाग क्रमांक-२ मधील सर्व सफाई कामगार व ‘स्वच्छ’ संस्थेच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी भेटवस्तू देऊन सन्मानित केले आणि त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.पुणे इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने सर्व शिक्षकांनी रेणुकाताईंचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पुणे इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष डॉ.हुलगेश चलवादी, सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल शिर्के, प्राचार्या स्मिता लोंढे, व्यवस्थापिका सायली शिंदे, बिना कदम, जयश्री कदम, आश्विनी मोहिते आणि ज्योती सचदेव उपस्थित होते.

वाढदिवसाचा आनंद स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो समाजातील गरजू, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांसोबत वाटून घेणाऱ्या रेणुकाताईंवर परिसरातील अनेक सामाजिक संस्था, तरुण मंडळे व कार्यकर्त्यांनी सत्कार करून शुभेच्छांचा वर्षाव केला. “आपल्या माणसांच्या चेहऱ्यावरील समाधान हीच माझी खरी भेट आहे,” अशा शब्दांत रेणुकाताईंनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *