Headlines

जुनी पेन्शनसाठी आता निर्णायक लढा!

२८ सप्टेंबरपासून आझाद मैदानात सहकुटुंब आंदोलन; आमरण उपोषणाचा इशारा

महाराष्ट्रातील २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय समितीची राज्यस्तरीय बैठक बुधवार, दि. २६ ऑगस्ट रोजी साधना विद्यालय, हडपसर, पुणे येथे पार पडली.

राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत शासनाच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. जुनी पेन्शन योजनेसाठी यापूर्वी अनेक आंदोलने करूनही शासनाकडून ठोस निर्णय झालेला नसल्याने आता आंदोलनाची निर्णायक दिशा निश्चित करण्यात आली.

बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार दि. १ ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी काळ्या फिती लावून शालेय कामकाज करतील. त्यानंतर दि. ५ सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मूक मोर्चा काढून शासनाला निवेदन देण्यात येणार आहे.

दि. २५ सप्टेंबरपर्यंत शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत ठोस निर्णय घेतला नाही, तर दि. २८ सप्टेंबर २०२६ पासून मुंबईतील आझाद मैदानावर सहकुटुंब आंदोलन व आमरण उपोषण करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा बैठकीत देण्यात आला.

यावेळी, “जुनी पेन्शन लागू करा, अन्यथा इच्छा मरणाची परवानगी द्या,” अशी टोकाची भूमिका घेण्याची वेळ शासनाने कर्मचाऱ्यांवर आणू नये, अशी तीव्र भावना प्रतिनिधींनी व्यक्त केली.

राज्यातील २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागणीची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *