आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना यकृत व किडनी प्रत्यारोपणासारख्या खर्चिक शस्त्रक्रिया शासकीय रुग्णालयात मोफत उपलब्ध करून देण्यासाठी जेजे रुग्णालयातील आवश्यक वैद्यकीय व प्रशासकीय तयारी तातडीने पूर्ण करावी. पुढील महिन्यापर्यंत यकृत व किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मोफत सुरू करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमार, आयुक्त अनिल भंडारी, जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रवींद्र चव्हाण, संबंधित विभागांचे अधिकारी तसेच नानावटी रुग्णालयाचे यकृत विभागाचे विभाग प्रमुख गौरव चौबल तसेच सैफी रुग्णालयातील किडनी प्रत्यारोपण विभागाचे विभाग प्रमुख डॉ गौरंग शहा उपस्थित होते.
बैठकीत प्रत्यारोपण शस्त्रक्रियांसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा, तज्ज्ञ मनुष्यबळ, शस्त्रक्रियागृह, उपकरणे आणि इतर अनुषंगिक व्यवस्थांचा आढावा घेण्यात आला.
तज्ज्ञ डॉक्टरांचे सहकार्य; मोफत शस्त्रक्रियांसाठी पुढाकार
जेजे रुग्णालयात यकृत आणि किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू करण्यासाठी नानावटी रुग्णालयातील संबंधित विभागाचे प्रमुख डॉ. गौरव चौबल यांचे सहकार्य मिळत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याच्या उद्देशाने त्यांनी जेजे रुग्णालयात सेवा देण्यास सुरुवात केली आहे.
डॉ. चौबल यांच्या रुग्णालयात दरमहा सुमारे ३० ते ४० यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होतात. त्यांच्या अनुभवाचा व तज्ज्ञ सेवेचा लाभ जेजे रुग्णालयातील रुग्णांना मिळणार आहे.
सैफी रुग्णालयातील यकृत व किडनी प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख डॉ. गौरंग शहा यांनीही जेजे रुग्णालयात आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोफत सेवा देण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यांच्या सहकार्यामुळे किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियांसाठी आवश्यक तज्ज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे.
