१ कोटी ७२ लाख रुपयांचा निकृष्ट औषधसाठा जप्त; हृदयविकार, बीपी आणि मधुमेहावरील औषधांत मूळ औषधी घटकच नसल्याचे उघड
FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांची कठोर कारवाई; नऊ औषधांचे विनापरवाना उत्पादन आणि विक्री केल्याचे तपासात निष्पन्न
पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथील औषधनिर्मिती क्षेत्राला हादरवणारा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक), उच्च रक्तदाब (बीपी) आणि मधुमेह (डायबिटीज) यांसारख्या गंभीर आजारांवर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांमध्ये आवश्यक मूळ औषधी घटकच नसल्याचा धक्कादायक प्रकार अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) तपासणीत समोर आला आहे.
जेजुरी येथील ‘इंडयूकेअर फार्मास्युटिकल अँड रिसर्च फाउंडेशन’ या औषधनिर्मिती कंपनीच्या तपासणीत अनियमितता आढळल्यानंतर FDA ने कठोर कारवाई केली आहे. संबंधित कंपनीचा औषध उत्पादन परवाना रद्द करण्यात आला असून औषधांचे उत्पादन, पॅकिंग आणि वितरण तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तपासादरम्यान आवश्यक परवानगी न घेता तब्बल नऊ औषधांचे उत्पादन करून त्यांची विक्री केल्याचेही उघड झाले आहे. या प्रकरणातील सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे पिंपरी-चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला (वायसीएम) पुरवठा करण्यात आलेल्या सुमारे १ कोटी ७२ लाख रुपये किमतीच्या निकृष्ट औषधसाठ्याची जप्ती करण्यात आली आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित कंपनीविरोधात न्यायालयीन कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही, असा कडक इशारा FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.
रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा गंभीर प्रकार!
रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधांवर विश्वास ठेवून उपचार घेत असतात. मात्र, जीव वाचविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांमध्येच आवश्यक औषधी घटक नसतील, तर ही बाब सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक आहे. औषधनिर्मिती कंपन्यांच्या गुणवत्ता नियंत्रणाची नियमित तपासणी करून अशा प्रकारांना आळा घालण्याची गरज आहे, अशी भावना पुरंदर तालुक्यातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
जेजुरीतील औषध कंपनीचा उत्पादन परवाना रद्द!
