
या परिक्रमेच्या निमित्ताने परिक्रमाकर्त्यांनी कऱ्हा नदीच्या तीरावरील प्राचीन शिवमंदिरांना भेट देत तेथील वैभवशाली इतिहास, मंदिर स्थापत्य रचना आणि धार्मिक महात्म्य जाणून घेतले. दोन दिवसांच्या या आध्यात्मिक आणि पर्यावरणीय प्रवासात गावोगावच्या नागरिकांनी परिक्रमाकर्त्यांचे अत्यंत उत्स्फूर्त आणि आत्मीयतेने स्वागत केले.
मंगळवारी (ता. २४) सकाळी गराडे येथील कऱ्हा नदीचे उगमस्थान असलेल्या चतुर्मुख महादेव मंदिरापासून विधिवत पूजन करून या परिक्रमेला सुरुवात झाली. त्यानंतर गराडे, कोडीत, सासवड, पांडेश्वर, आंबी खुर्द, जळगाव सुपे, बारामती ते थेट कऱ्हा व नीरा नद्यांच्या संगमावरील सोनगावच्या सोनेश्वर मंदिरापर्यंतचा प्रवास परिक्रमाकर्त्यांनी पूर्ण केला. संगमावर पारंपरिक पद्धतीने पूजा व अभिषेक संपन्न झाल्यानंतर नदीच्या दुसऱ्या काठाने परिक्रमा मार्गस्थ झाली. या संपूर्ण प्रवासात पंचमुखी, कोटेश्वर, संगमेश्वर, पांडवेश्वर, रामेश्वर, सिद्धेश्वर, सोनेश्वर, जवळेश्वर, काशीविश्वेश्वर आणि चांगावटेश्वर अशा ऐतिहासिक व प्राचीन शिवालयांचे दर्शन घेत बुधवारी (ता. २५) रात्री पुन्हा चतुर्मुख या उगमस्थानी पोहोचून परिक्रमेची भक्तीमय वातावरणात सांगता झाली.
परिक्रमेदरम्यान बुधवारी सायंकाळी सासवड येथील कऱ्हाकाठावरील पुरातन श्री चांगावटेश्वर मंदिराजवळील नदीघाटावर अत्यंत मंगलमय वातावरणात विशेष पूजन सोहळा पार पडला. पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप आणि ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप यांच्या शुभहस्ते कलशपूजन, कऱ्हापूजन तसेच गंगा आणि कऱ्हामाईची महाआरती करण्यात आली. या भक्तीमय सोहळ्याप्रसंगी नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप, गटनेते अजित जगताप, पाणीपुरवठा सभापती ज्ञानेश्वर गिरमे आणि नगरसेवक प्रदीप राऊत यांनी परिक्रमाकर्त्यांचे स्वागत करत उपक्रमाचे कौतुक केले.
या संपूर्ण उपक्रमाचे यशस्वी नियोजन कऱ्हा परिक्रमेचे आयोजक विजय कडू, विराज फरांदे, विनोद कबनूरकर यांच्यासह रवींद्रपंत जगताप, प्रा. दिपक जांभळे, राजेश शिंदे, तेजस शिवरकर, अमित पवार, आकाश दळवी, हनुमंत हिंगणे, आप्पासो पोमणे, बापू भगत, रोहिणी कामथे व सहभागी नागरिकांनी केले.
नद्यांचे प्रदूषण रोखणे आणि जलस्रोतांचे जतन करणे काळाची गरज असल्याचे अधोरेखित करत, या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर, नागरिक व परिक्रमाकर्त्यांनी कऱ्हा नदी स्वच्छ आणि अखंड वाहती ठेवण्याची सामूहिक शपथ घेतली. सासवड येथे चांगावटेश्वर सुधार समितीचे प्रसाद जगताप, सुनील कामथे तसेच सासवड सांस्कृतिक मंडळाचे संजय काटकर, दिपक जगताप आणि तुषार ढुमे आदींनी सर्व परिक्रमाकर्त्यांचे यथोचित स्वागत केले.
