संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांच्या खासदारांनी केलेल्या गदारोळामुळे आज आणखी 49 खासदारांना निलंबित करण्यात आले. अशा प्रकारे संसदेतून निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची संख्या 141 वर पोहोचली आहे.
त्यामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. आज निलंबित झालेल्या खासदारांमध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचाही समावेश आहे.
संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन घेरले आहे. संसदेच्या सुरक्षेबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्याची मागणी करत विरोधकांनी गोंधळ सुरू केला. लोकसभेत अध्यक्षांचा अपमान करणाऱ्या अनेक खासदारांना आज पुन्हा निलंबित करण्यात आले आहे.
निलंबित खासदारांना संपूर्ण हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होण्यापासून रोखण्यात आले आहे. या खासदारांमध्ये सुप्रिया सुळे, मनीष तिवारी, शशी थरूर, मोहम्मद फैसल, कार्ती चिदंबरम, सुदीप बंदोपाध्याय, डिंपल यादव आणि दानिश अली यांच्यासह लोकसभेतील अनेक विरोधी खासदारांना संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, “सभागृहात फलक न आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर निराश होऊन ते असे पाऊल उचलत आहेत. त्यामुळेच आम्ही (खासदारांना निलंबित करण्याचा) प्रस्ताव आणत आहोत.”
आज निलंबित झालेले खासदार मनीष तिवारी, चंद्रशेखर प्रसाद, डिंपल यादव, कार्ती चिदंबरम, एसटी हसन, सुप्रिया सुळे, शथी थरूर, दानिश अली, माला रॉय, राजीव रंजन सिंग, संतोष कुमार, प्रतिभा सिंग, मोहम्मद सादिक, जगबीर सिंग गिल, महाबली सिंग, एमके विष्णू प्रसाद. , फारुख अब्दुल्ला, गुरजीत सिंग औजला, फजलुर रहमान, रवनीत सिंग बिट्टू, दिनेश यादव, के सुधाकरन, सुशील कुमार रिंकू.