राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत चर्चेची चर्चा;ठाकरे गट–रासपामध्येही गाठीभेटी,स्वबळाच्या तयारीने वाढवली उत्सुकता
बारामती – बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सध्या चांगलीच रंगली आहे.विविध राजकीय पक्ष,गट आणि इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीच्या तयारीला वेग दिला असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते पॅनेल बांधणीपर्यंतच्या हालचालींना जोर आला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार),भाजपा,शिवसेनेचे दोन्ही गट,राष्ट्रीय समाज पक्ष,शेतकरी कृती समिती तसेच विविध स्थानिक गट आणि अपक्ष इच्छुकांकडून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू असल्याचे चित्र आहे.त्यामुळे निवडणूक प्रत्यक्षात रंगणार की शेवटच्या टप्प्यात सर्वानुमते बिनविरोध होणार,याकडे कारखान्याच्या सभासदांचे लक्ष लागले आहे.राजकीय बैठका आणि गाठीभेटींना वेग आला आहे.सोमेश्वर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पातळीवर विविध राजकीय गटांमध्ये चर्चा सुरू असल्याचे चित्र आहे.विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार का,याबाबत स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.दरम्यान, 25 सप्टेंबर रोजी शरद पवार यांच्या पुढाकाराने बिनविरोध निवडणुकीच्या शक्यतेवर पवार कुटुंबीयांची बैठक झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. मात्र,त्यानंतर प्रत्यक्षात कोणते अंतिम राजकीय समीकरण तयार होते,हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.तसेच ठाकरे गट–रासपामध्येही चर्चेला वेग आला आहे.दुसरीकडे,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष हनुमंत भापकर आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार जालिंदर लकडे यांच्यात नुकतीच चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.या चर्चेत एकत्रितपणे निवडणूक लढण्याबाबत विचारविनिमय झाल्याचे सांगितले जात असले,तरी या संभाव्य आघाडीबाबत अधिकृत अंतिम निर्णय जाहीर झालेला नाही.त्यामुळे आगामी काही दिवसांत या चर्चेला कोणते स्वरूप येते,हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.काही गट स्वबळावर मैदानात उतरण्याच्या तयारीतएकीकडे संभाव्य आघाड्या आणि राजकीय जुळवाजुळवीच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे काही पक्ष आणि गटांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी सुरू ठेवली आहे.भाजपा,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट तसेच शेतकरी पॅनेल आणि स्थानिक इच्छुकांकडून स्वतंत्र मोर्चेबांधणी सुरू असल्याचे वृत्त यापूर्वीही समोर आले आहे.त्यामुळे सोमेश्वरच्या निवडणुकीत एकापेक्षा अधिक पॅनेल रिंगणात राहण्याची शक्यता कायम आहे.येत्या दोन दिवसात माघारीनंतर चित्र होणार स्पष्ट होईल.सध्या अनेक इच्छुक उमेदवारांनी आपापल्या पातळीवर सभासदांशी संपर्क,बैठका आणि सभासदांच्या गाठीभेटींना सुरुवात केली आहे.मात्र,कोणत्या पक्षाचा कोणता उमेदवार अंतिम पॅनेलमध्ये राहणार,कोण कोणासोबत जाणार आणि कोणत्या ठिकाणी स्थानिक पातळीवर आघाडी होणार,याचे चित्र अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही.उमेदवारी अर्जांची संख्या मोठी असल्याने माघारीच्या टप्प्यानंतरच निवडणुकीचे अंतिम राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. 30 सप्टेंबरपर्यंत माघारीची प्रक्रिया असून त्यानंतर प्रत्यक्ष रिंगणात किती पॅनेल आणि किती उमेदवार राहतात,याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.त्यामुळे सध्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ‘आघाडी होणार की स्वबळावर लढत होणार?’, ‘बिनविरोधाचा मार्ग निघणार की निवडणुकीचा सामना रंगणार?’ या प्रश्नांची चर्चा सुरू आहे.आगामी काही दिवसांत होणाऱ्या बैठका,गाठीभेटी आणि माघारीच्या प्रक्रियेनंतरच सोमेश्वरच्या राजकीय मैदानातील अंतिम समीकरण स्पष्ट होणार आहे.
