Headlines

‘जेन झी आणि अल्फा पिढी आमच्यापेक्षा अधिक जागरूक;

शेतीच्या पाण्यासाठी कोणत्या योजना कोणी आणल्या,हे नव्या पिढीला समजणे गरजेचे’ — आमदार दिलीप सोपल

बार्शी – ‘आजची जेन झी आणि अल्फा पिढी आमच्यापेक्षा अधिक जागरूक आहे. बार्शी तालुक्यातील सिंचन योजनांची निर्मिती कशी झाली आणि त्यासाठी कोणी पुढाकार घेतला, याची वस्तुस्थिती नव्या पिढीला समजणे गरजेचे आहे,’ असे सांगत आमदार दिलीप सोपल यांनी शेतीच्या पाण्यासाठी आपल्या ४१ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत केलेल्या कामांचा पत्रकार परिषदेत लेखाजोखा मांडला.

१९८४-८५ मध्ये आमदार म्हणून निवडून आल्यानंतर तालुक्यात लघुप्रकल्प, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आणि सिमेंट बंधारे उभारण्याच्या कामाला सुरुवात केल्याचे सोपल यांनी सांगितले. पिंपळगाव-ढाळे प्रकल्पाचे १९८७ मध्ये भूमिपूजन झाले. आंदोलनामुळे काही वर्षे रखडलेला हा प्रकल्प २००४ मध्ये पूर्ण झाला. भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून घेतल्याचेही त्यांनी नमूद केले.

हिंगणी प्रकल्पाची सुरुवात माजी आमदार दिवंगत आबासाहेब बुरगुटे यांनी करून तो पूर्ण केला. जवळगाव प्रकल्पाची सुरुवात दिवंगत आमदार शहाजीराव पाटील यांनी केली आणि त्यांच्या तसेच आमदार चंद्रकांत नाना निंबाळकर यांच्या प्रयत्नांतून तो पूर्ण झाला, असे सोपल यांनी स्पष्ट केले. पाथरी आणि कोरेगाव हे ब्रिटिशकालीन तलाव असून, त्यांच्या पुनर्बांधणी व मजबुतीकरणासाठीही प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कळंबवाडी, बाभूळगाव आणि मांडेगाव येथील प्रकल्पांसह मुंगशी, सासुरे आणि दहिटणे येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांसाठी पाठपुरावा केल्याचे सोपल म्हणाले. संगमनेर, मालेगाव आणि सुर्डी येथील साठवण प्रकल्पही पूर्ण झाल्याचे त्यांनी नमूद केले.

बार्शीच्या सिंचनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या उजनी बोगदा आणि बार्शी उपसा सिंचन योजनेला १९९४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या माध्यमातून मान्यता मिळाली. त्यानंतर १९९५ मध्ये महायुती सरकारच्या काळात या योजनेला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. वाढीव कामासाठी २०११ मध्ये दुसरी प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे सोपल यांनी सांगितले.

२००९ ते २०१४ या कालावधीतील अखेरची दोन वर्षे मंत्रिपदावर असताना तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून योजनेसाठी निधी मिळवून दिला. त्यामुळे २०१४ च्या अखेरीस उपसा सिंचन योजनेचे पाणी पहिल्यांदा उपळाई ठोंगे आणि लक्ष्याचीवाडी परिसरापर्यंत पोहोचले. बार्शी शहरातील गणेश तलावातही पाणी सोडण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

‘कोणी काय केले किंवा केले नाही, यावर भाष्य करण्यापेक्षा आम्ही तालुक्यासाठी आजपर्यंत काय केले, याची माहिती जेन झी आणि अल्फा पिढीला मिळावी. त्याचबरोबर जुन्या पिढीच्या विस्मरणात गेलेल्या कामांनाही उजाळा मिळावा, या उद्देशाने हा लेखाजोखा मांडला आहे,’ असे सोपल यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *