प्रचार ऐन रंगात आला आहे. अशातच एकमेकांना टोले, टोमणे मारण्यासह आता महायुती आणि मविआचे घटकपक्ष एकमेकांवरच कुरघोड्या करू लागले आहेत. यंदाच्या निवडणुकीला रंगत चढत असताना तिकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे, अजित पवारांवर जोरदार टोलेबाजी केली आहे.
सोलापूर उत्तरमध्ये महेश कोठे यांच्या प्रचारासाठी पाटील आले होते. आम्ही अशी योजना आणतोय की मोदींना पाच लाखांची वैद्यकीय बिले द्यावी लागणार नाहीत. प्रत्येक कुटुंबाचा २५ लाखांचा आरोग्य विमा काढणार आहोत. ब्रिच कँडी हॉस्पिटलला गेलात तर त्याचे पैसे राज्य सरकार देणार आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
गुजरातला फॉक्सकॉ़न गेले त्यावर हे काही बोलले नाहीत. दीड लाख नोकऱ्या मिळाल्या असत्या. मोदींनी सांगितलेले त्यापेक्षा मोठा प्रकल्प देऊ पण तो प्रकल्प आजतागायत आलेला नाही, असे पाटील म्हणाले. शिंदे लोकांना घेऊन दावोसला गेले तिथून अनेक गुंतवणूक आल्याच्या पुड्या सोडल्या.
गुंतवणूक तर आली नाहीच पण तिथल्या हॉटेल वाल्याने बिल पाठवले, ते भरा म्हणून सांगितले. ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच त्यांनी दावोसमध्ये केले असा टोला पाटलांनी हाणला. भ्रष्टाचारात यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही सोडला नाही. शेवटच्या आठ दिवसांत पैशांचा पाऊस पडणार असल्याचा दावा पाटील यांनी केला.
तसेच रात्रीच्या १० वाजता प्रचार संपतो, घड्याळ चोरीला गेले असले तरी मला वेळ कळतो, असा टोलाही पाटील यांनी अजित पवारांना उद्देशून लगावला. तसेच दाढीवाला बाबा १५०० रुपये देण्याचे सांगतोय तर आज आलेला बाबा ३०००, असे घरी गेल्यावर सांगा, कोणाचे जास्त ते ही पहा असे पाटील म्हणाले.