Headlines

माळेगाव पोलीस ठाण्याच्या कंपाऊंडच्या कामावर मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

पाण्याचा नळ सुरू करताना २३ वर्षीय निखिल पवार याला विजेचा तीव्र धक्का; बारामती मेडिकल कॉलेजमध्ये उपचारादरम्यान मृत्यू

माळेगाव (बारामती) – माळेगाव पोलीस ठाण्याच्या वॉल कंपाऊंडचे बांधकाम सुरू असताना पाण्याचा नळ सुरू करण्यासाठी गेलेल्या २३ वर्षीय मजुराचा विजेच्या तीव्र धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. निखिल उमेश पवार (वय २३,रा.आसमाईच्या पाठीमागे,सुतगिरण,पणदरे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने पणदरे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

माळेगाव पोलीस ठाण्याच्या वॉल कंपाऊंडचे काम गेल्या सहा ते सात महिन्यांपासून सुरू आहे.पणदरे येथील काशिनाथ भगवान लोखंडे यांनी या बांधकामातील सेंट्रिंगचे काम घेतले असून,पणदरे गावातील मजूर व कामगार या ठिकाणी काम करीत असल्याची माहिती आहे.

दरम्यान,बांधकामावर पाणी मारण्यासाठी पाण्याच्या टँकरमध्ये विद्युत मोटर पंप सोडण्यात आला होता.त्यानंतर टँकरमधील पाण्याचा नळ सुरू करण्यासाठी निखिल पवार हा कामगार गेला असता त्याला अचानक विजेचा तीव्र धक्का बसला.विजेचा धक्का बसल्याने तो जागीच बेशुद्ध पडला.

घटनेनंतर सहकाऱ्यांनी व उपस्थितांनी तातडीने निखिल याला उपचारासाठी बारामती येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. मात्र,उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.

निखिलच्या मृत्यूची बातमी पणदरे गावात समजताच ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली.अल्पवयातच कष्ट करून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या निखिलचा अशा पद्धतीने दुर्दैवी अंत झाल्याने ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली.

दरम्यान,बांधकामाच्या ठिकाणी विद्युत मोटर आणि पाण्याची व्यवस्था करताना आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का,विद्युत उपकरणांची सुरक्षितता तपासण्यात आली होती का,तसेच या दुर्घटनेला नेमकी कोणती परिस्थिती कारणीभूत ठरली,याबाबत संबंधित यंत्रणेकडून चौकशी होणे आवश्यक आहे.घटनेचा अधिकृत तपास झाल्यानंतरच अपघाताची नेमकी कारणे स्पष्ट होणार आहेत.

या दुर्दैवी घटनेमुळे बांधकाम कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून,अशा ठिकाणी विद्युत उपकरणांचा वापर करताना सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *