मनोज जरांगे पाटील : “आता आम्ही ठरवलंय ओबीसीतूनच आरक्षण घेणार”

Photo of author

By Sandhya

मनोज जरांगे पाटील

राज्यात मराठा आरक्षणावरून मराठा आंदोलन मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली डेडलाईन संपून गेली असून  आता चलो मुंबईची हाक मराठा समाजाकडून करण्यात येत आहे. त्यानुसार आता  भगवे वादळ हे  मुंबईत धडकणार असल्याचे म्हटले जात आहे.

त्यातच आता मनोज जरांगे यांनी आता आम्ही ठरवलंय ओबीसीतूनच आरक्षण घेणार असल्याचे म्हणत पुन्हा एकदा शड्डू ठोकला आहे. याविषयी बोलताना मनोज जरांगे यांनी,”छत्रपती शिवरायांच्या काळात जास्त महत्व ध्येय आणि विचारांना दिलं जात होतं.

त्याचप्रमाणे आमचं ध्येय आणि सूत्र ठरलं आहे. गोरगरीब मराठ्यांच्या ध्येयांसाठी आम्ही काम करत आहे असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सगळ्या महाराष्ट्राला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, मनोज जरांगे यांनी,”आम्ही ठरवलं आहे आता महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण घेणार. आमचा जीव गेला तरीही मुंबईचे आंदोलन होणारच.

लाठीचार्जमध्ये हात-पाय मोडले गेले. मी ते काहीही विसरलो नाही. त्या किंकाळ्या इतक्या होत्या की गाव हादरलं होतं. पण आता गाव त्याच ताकदीने पेटून उठलं आहे. जे रक्त सांडलं त्याचं बळ निर्माण झालं आहे. तो विषय काढण्यासारखा नाही असंही जरांगे पाटील यांनी म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारवर टीका केली आहे.

आंतरवली सराटीच्या लाठीचार्ज विषयी बोलताना, “त्या घटनेची आठवण आली की आजही माझ्या अंगावर काटा येतो. मोठा आवाज, रक्ताने माखलेली जागा, धूर, लाठीचार्ज, माता माऊलींच्या किंकाळ्या, अमानुष लाठीचार्ज ही घटना आठवली की सरकारचं तोंडही पाहू नये असं वाटतं. ही घटना आठवून वाटतं की इतकं निर्दयी आणि अमानुष सरकार असू नये.

मुद्दामहून आत घुसून लाठीचार्ज केला गेला. साऊंड पाडले, आवाज येऊ नये म्हणून वायर तोडल्या. साध्या वेशातल्या त्यांच्या लोकांनी एकमेकांना ढकलणं हे सगळं मी समोर पाहिलं ते आठवलं की मन सुन्न होतं. ज्या मातामाऊलींचं रक्त सांडलं आहे ते वाया जाऊ देणार नाही. या समाजासाठी मरेपर्यंत गद्दारी करणार नाही ” असे आश्वासन जरांगे पाटील यांनी दिले आहे.

Leave a Comment