लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मंगळवारी शिवतीर्थावर झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यात केली.
या निवडणुकीच्या रिंगणात मनसे उतरणार नाही, असे सूचित करताना विधानसभेच्या तयारीला लागा, असे आवाहन त्यांनी मनसैनिकांना केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी राज ठाकरे गेल्या महिन्यात दिल्लीवारी करून आले. तेव्हापासून लोकसभा निवडणुकीत मनसेची भूमिका काय राहील, महायुतीच्या सोबत मनसे जाईल का, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
ती राज ठाकरे यांनीच आपल्या गुढीपाडवा मेळाव्यात छोटेखानी भाषण करून संपवली आणि निवडणूक न लढवता मनसे महायुतीमध्ये दाखल झाली. येणारी निवडणूक देशाचे भविष्य ठरविणारी आहे. देश खड्ड्यात जाईल की प्रगतीच्या वाटेवर हे ठरविणारी ही निवडणूक आहे.
वाटाघाटी मला करता येत नाहीत. तो माझा पिंड नाही. राज्यसभाही नको आणि विधान परिषदही नको. माझ्या काहीही अपेक्षा नाहीत. या देशाला आत्ता खंबीर नेतृत्वाची गरज आहे. फक्त नरेंद्र मोदींसाठी मी भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे, अशी घोषणा राज यांनी केली.
महायुतीच्या दिशेने कसा झाला प्रवास? महायुतीच्या पाठिंब्याच्या दिशेने झालेला प्रवास सांगताना राज म्हणाले, दीड वर्षापासून एकत्र आलं पाहिजे, असे सुरू होते. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटले.
म्हणाले, आपण एकत्र काम करायला हवे. देवेंद्र फडणवीस भेटले. तेही म्हणाले, एकत्र काम करायला हवे. मी म्हणालो, एकत्र काम करायचे म्हणजे काय करायचे? हे राज्यात स्पष्ट होत नव्हते.
त्यामुळे मी अमित शहा यांना फोन केला व दिल्लीत जाऊन त्यांना भेटलो. यानंतर जागावाटपाची चर्चा झाली. अशा चर्चेस मी शेवटचा बसलो 1995 साली. त्यामुळे माझा जागावाटपाच्या चर्चेचा पिंड नाही. दोन तू घे – मी दोन घेतो… मी इकडे सरकवतो, तू तिकडे सरकव, अशा चर्चा मला जमत नाहीत. त्यामुळे मी सांगितले मला काहीही नको.
माझा बिनशर्त पाठिंबा आहे. अमित शहांच्या भेटीनंतर जे चक्र सुरू झाले. ‘आज मला असे वाटते’ वाल्या चॅनेल्सनी दे ठोकून बातमी देणे सुरू केले. चर्चेत केवळ अमित शहा आणि मी होतो.
तुम्हाला कुठून कळलं? दिल्लीला आदल्या दिवशी पोहोचलो तर राज ठाकरेंना बारा तास थांबायची वेळ आली, अशा बातम्या चालल्या. अरे गधड्या, भेट दुसर्या दिवशीची ठरली होती, अशा तिखट शब्दांत राज यांनी माध्यमांवर तोंडसुख घेतले.