
लाखोंचे नुकसान; ज्युबिलंटच्या अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात, जीवितहानी टळली
नीरा, ता. पुरंदर : नीरा शहराच्या मुख्य बाजारपेठेतील लक्ष्मी रोडवरील गौरी शू पॅलेस या चप्पल दुकानाच्या वरच्या मजल्यावरील गोडाऊनला रविवारी सकाळी दहाच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याने बाजारपेठेत एकच खळबळ उडाली. गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर चप्पल, पुठ्ठे व इतर साहित्य असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. आगीचे मोठे लोळ आणि धुराचे लोट परिसरात पसरल्याने शेजारील दुकाने व रहिवासी इमारतींना धोका निर्माण झाला होता. मात्र, ज्युबिलंट इनग्रेव्हीया कंपनीच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी दाखल होत शर्थीचे प्रयत्न केल्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र गोडाऊनमधील साहित्य जळून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
रविवारी सकाळी गौरी शू पॅलेसच्यावरच्या मजल्यावरील गोडाऊनमधून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर येत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. काही वेळातच गोडाऊनमध्ये आग लागल्याचे स्पष्ट झाले. परिसरातील युवकांनी तत्काळ आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोडाऊनमध्ये चप्पल, पुठ्ठे आणि अन्य ज्वलनशील साहित्य मोठ्या प्रमाणावर असल्याने आग वेगाने पसरली. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट वाढू लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. शेजारील दुकानदारांनी खबरदारी म्हणून दुकाने बंद करून सुरक्षित ठिकाणी धाव घेतली, तर रहिवाशांमध्येही घबराट पसरली.
घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलीस पाटील राहुल शिंदे यांनी तातडीने ज्युबिलंट इनग्रेव्हीया कंपनीच्या अग्निशमन विभागाशी संपर्क साधून मदतीची विनंती केली. तसेच नीरा पोलीस दूरक्षेत्राला घटनेची माहिती देत बाजारपेठेतील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली. दरम्यान, वीज वितरण कंपनीकडून खबरदारी म्हणून परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
माहिती मिळताच ज्युबिलंटचे फायर युनिट तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेत विविध बाजूंनी पाण्याचा मारा सुरू केला. गोडाऊनमधील मोठ्या प्रमाणातील साहित्यामुळे आग भडकलेली असतानाही अग्निशमन कर्मचाऱ्यांनी धाडसाने आग विझविण्याचे काम सुरू ठेवले. अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले आणि संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
या कारवाईत ज्युबिलंटचे फायर कर्मचारी विशाल टेंगले, धनंजय धायगुडे, प्रकाश बेचके, अनिल जाधव, राजू गोरे आणि नासिर शेख यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
दरम्यान, नीरा शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेत ही घटना घडल्याने घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे काही काळ लक्ष्मी रोडवरील वाहतुकीची कोंडी झाली. घटनेची माहिती मिळताच नीरा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक रवीराज कोकरे, संतोष मदने, सचिन निकम तसेच प्रभारी पोलीस पाटील राहुल शिंदे यांनी घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात ठेवत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, आगीमुळे जवळापास १५ लुााचे खनुकसान झाल्याची माहिती व्यापारी संपत मोठे यांनी दिली आहे . ज्युबिलंटच्या अग्निशमन दलाने वेळीच केलेल्या प्रभावी कारवाईमुळे मोठी आग शेजारील दुकाने आणि इमारतींपर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यात आले.
