नाना पटोले : मराठवाड्यात दुष्काळ जाहीर न करणे ही शेतकर्‍यांची थट्टा!

Photo of author

By Sandhya

नाना पटोले

राज्य सरकारने मराठवाड्यासाठी 59 हजार कोटींच्या योजना घोषित केल्याचा फक्त ढोल पिटला आहे; पण हा आकड्यांचा खेळ आहे. प्रत्यक्षात जनतेच्या हाती काही मिळेल तेव्हाच कळेल, असे सांगत दुष्काळाच्या सावटाखाली असणार्‍या मराठवाड्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत.

अशा परिस्थितीत सरकारने दुष्काळ जाहीर न करता शेतकर्‍यांची एकप्रकारे थट्टाच केली आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. सरकारने मराठवाड्यात काही हजार कोटींच्या योजना दिल्याचे जाहीर केले; पण त्या प्रत्यक्षात कधी येतील, हे सांगता येत नाही.

संपूर्ण मराठवाडा दुष्काळाच्या झळा सहन करत आहे. खरीप वाया गेले आहे. मराठवाड्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी वाढलेली आहे, जनावरांना चारा नाही, शेतकर्‍याला मोठ्या मदतीची गरज आहे; पण सरकारने त्याकडे लक्ष दिलेले दिसत नाही.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आघाडी सरकारने मराठवाड्यासाठी काहीच केले नाही, हे सांगत होते. त्यावेळी त्यांच्या शेजारी एकनाथ शिंदे आणि अजित पवार बसलेले होते; पण यापैकी एकानेही फडणवीसांचे म्हणणे खोडून काढले नाही; मग शिंदे आणि पवार आघाडी सरकारमध्ये काय करत होते? असा सवाल पटोले यांनी केला.

Leave a Comment