पंतप्रधान मोदी : छोट्या शहरांतील युवक करीत आहेत स्टार्टअप क्रांतीचे नेतृत्व…

Photo of author

By Sandhya

पंतप्रधान मोदी

छोट्या शहरांतील युवक स्टार्टअप क्रांतीचे नेतृत्व करीत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी स्टार्टअप महाकुंभ कार्यक्रमात बोलताना केले. ‘भारत मंडपम’ मध्ये आयोजित कार्यक्रमास देशभरातील स्टार्टअप क्षेत्रातील युवक उपस्थित होते.

‘स्टार्टअप इंडिया’अभियानाअंतर्गत नवसंकल्पांना व्यासपीठ देण्याचे काम देशाने केले आहे, असे सांगत पंतप्रधान म्हणाले, ‘‘स्टार्टअप इकोसिस्टिम केवळ मोठ्या शहरापुरती मर्यादित राहिलेली नाही तर छोट्या शहरांतील युवक देखील या क्रांतीचे नेतृत्व करीत आहेत.

अनेक लोक स्टार्टअप लॉंच करीत असतात. राजकारणातही असे लाँचिंग वारंवार होत असते. पण तुम्ही लोक प्रयोगशील असता, हा त्यातला फरक आहे. आज युवकांचे सामर्थ्य पूर्ण जग बघत आहे. युवकांच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवत स्टार्टअप इको सिस्टिमच्या दृष्टीने पावले उचलली आहेत.’’

रोजगार मागण्याऐवजी इतरांना रोजगार देण्याचा मार्ग युवकांनी निवडला आहे, असे सांगून मोदी म्हणाले की, देशातील स्टार्टअप इकोसिस्टिम जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. सव्वा लाखांपेक्षा नोंदणीकृत स्टार्टअप असून याद्वारे बारा लाख लोकांना रोजगार मिळाला आहे.

देशात ११० पेक्षा जास्त युनिकॉर्न आहेत. आपल्या स्टार्टअप्सनी १२ हजारपेक्षा जास्त पेटंटची नोंदणी केली आहे. स्टार्टअपमधील महिलांसाठी हिस्सेदारी ४५ टक्के इतकी आहे. मागील काही दशकांत भारताने आयटी आणि संगणक क्षेत्रात आपली छाप सोडली.

आता नवसंकल्पना आणि स्टार्टअप क्षेत्रात देश मोठी मजल मारत आहे, असे मोदी यांनी सांगितले. यावेळच्या हंगामी अर्थसंकल्पात सरकारने संशोधन आणि नवसंकल्पनांसाठी एक लाख कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा करण्यात आल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले

Leave a Comment