
पुणेकरांनो पाणी जपून वापरा | येत्या सोमवारपासून रोटेशन पद्धतीने (एक दिवसाआड) पाणीपुरवठा होण्याची शक्यता
| महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिले एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे संकेत
पुणे : पुण्यात पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने सोमवारपासून रोटेशन पद्धतीने पाणीकपात लागू होण्याची शक्यता आहे. महापौर मंजुषा नागपुरे यांनी यासंदर्भात नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. महापौर यांनी सांगितले की, प्रशासनाला याबाबत नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुणेकरांना आता एक दिवसआड पाणीपुरवठा होणार हे अटळ आहे.
सध्या उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढली असून, धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने महापालिकेला कपातीचा निर्णय घ्यावा लागण्याची शक्यता आहे. महापौर नागपुरे यांनी सांगितले की, पाणीपुरवठा एक दिवसाआड करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक पाण्याचा वापर टाळावा आणि पाण्याची साठवणूक करून ठेवावी.
गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील कात्रज, कोंढवा, सिंहगड रोड, धायरी, सनसिटी, वडगाव बुद्रुक, हिंजवडी या भागांमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीकपात सुरू आहे. आता शहरभरात ही कपात वाढण्याची शक्यता आहे.
महापालिकेने यापूर्वीही रोटेशन पद्धतीने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे २५% पाण्याची बचत होते.
महापालिका प्रशासन लवकरच क्षेत्रनिहाय वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता आहे. तोपर्यंत पुणेकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेत महापौर यांच्या सोबत उपमहापौर परशुराम वाडेकर, सभागृह नेते गणेश बिडकर, आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर, मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप उपस्थित होते.
—-