संजय राऊत यांचे भाकीत, ‘२०२४ पर्यंत भाजपही फुटलेला असेल…

Photo of author

By Sandhya

संजय राऊत यांचे भाकीत

“इंडियाच्या स्थापनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एनडीएची आठवण झाली. एनडीएची खरी ताकद शिवसेना आणि अकाली दल होती.

आता एनडीए म्हणजे नुसती नौटंकी आहे; २०२४ च्या आधी भाजपही फुटलेला असेल, असे भाकीत उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे. आज (दि. २६) माध्यमांशी ते बोलत होते.

“उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेच्या मुद्यावरून राजीनामा दिला होता. महाराष्ट्रात बेकायदेशीर सरकार चालवायला विधानसभा अध्यक्षाचं समर्थन आहे.

भाजपकडे जर नितीमत्ता शिल्लक असेल तर १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घ्यावा. २०२४ साली भाजपचे अकल्याण झाल्याशिवाय राहणार नाही,” अशी टीकाही राऊत यांनी भाजपवर केली आहे.

संजय राऊत सुप्रीम कोर्ट आहेत का? : दीपक केसरकर “अपात्रतेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार अध्यक्षांचा आहे, त्यामुळे अध्यक्षांवर टीका करणे चुकीचं आहे.

सुप्रीम कोर्टाने काय बोलायचं हे तुम्ही ठरवणार आहात का? संजय राऊत सुप्रीम कोर्ट आहेत का? असा सवाल शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना केला आहे.

संजय राऊत काय बोलतात याला काहीही अर्थ नाही. एखादा पराभूत पक्षाचा नेता काहीही बोलू शकतो, ते बोलतात याला कोणताही पाया नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टातील याचिकांवर राऊत यांनी टीका करू नये.

आमची बाजू सत्याची आहे, आम्हाला न्याय मिळेल, असे केसरकर यांनी म्हटले आहे. तसेच भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत मतभेद नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Leave a Comment