सुषमा अंधारे : गडकिल्ल्यांचा सातबारा राणे यांच्या बापाचा नाही…

Photo of author

By Sandhya

सुषमा अंधारे

छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेल्या गडकिल्ल्यांचा सातबारा हा नारायण राणेंच्या बापाचा नाही, तर हा सातबारा महाराष्ट्राच्या बापाचा आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली. राणे पिता- पुत्रांकडून महाराष्ट्राची शांतता भंग करण्याचे काम सुरू असून त्यांच्यावर सामाजिक अशांतता पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील पुर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना घडली. या ठिकाणी शिवसेना नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे भेट देण्यासाठी गेल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे

व त्यांच्या मुलाने आकांडतांडव करून स्थानिकांना धमकी दिल्याचा आरोप करत पुणे शहर शिवसेनेतर्फे गुरुवारी बालगंधर्व रंगमंदिर जवळील झाशी राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्यासमोर राणे यांच्या पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करण्यात आले. या वेळी अंधारे यांनी राणे पिता-पुत्रासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घाणाघाती टीका केली.

या वेळी शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, पल्लवी जावळे, कल्पना थोरवे, राहिनी पल्हाळ, सुनिता खंडाळकर, अमृत पठारे, ज्योती चांदेरे, प्रशांत बधे, आनंद गोयल, प्रशांत राणे, भरत कुभारकर, आनंत घरत आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आंदोलकांनी नारायण राणे आणि नीलेश राणे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

अंधारे म्हणाल्या, राणेंकडून उद्दामपणाची आणि गुंडगिरीची भाषा केली जाते. पत्रकारांच्या हातातले बूम काढून घेतले जातात. त्यामुळे नारायण राणेंवर सामाजिक शांतता बिघडवण्यासाठी चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले पाहिजेत.

राणेंवर गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आहे. सरकारला आंदोलने हाताळता येत नाहीत. त्यामुळे सरकारकडून आंदोलने चिरडण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही अंधारे यांनी या वेळी केला.

नितेश राणे आणि पुतळ्याचे काम केलेला जयदीप आपटे मित्र असून नितेश राणे यांनीच आपटेला काम मिळवून दिले, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. तसेच आपटेचे सनातन प्रभातशी संबंधीत आहेत का हे तपासणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.

Leave a Comment