


बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात होणार आहे. यासाठी एकूण ४७८ मतदान केंद्रे आहेत, यापैकी मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या उद्देशाने विविध संकल्पनांवर आधारित पाच विशेष मतदान केंद्रे उभारण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी दिली.
यामध्ये केंद्र क्रमांक १२१, मुलींचे शासकीय वसतिगृह, एमआयडीसी येथे ‘पिंक मतदान केंद्र’ तयार करण्यात आले आहे. तसेच केंद्र क्रमांक २६१, राधेश्याम अग्रवाल ज्युनिअर कॉलेज, बारामती येथे ‘आदर्श मतदान केंद्र’, केंद्र क्रमांक २२५, जिल्हा परिषद शाळा, पिंपरी येथे ‘युवा मतदान केंद्र’, केंद्र क्रमांक २५८, जिल्हा परिषद शाळा, माळेगाव येथे ‘दिव्यांग मतदान केंद्र’ आणि केंद्र क्रमांक ४७, जिल्हा परिषद शाळा, डोर्लेवाडी येथे ‘युनिक मतदान केंद्र’ उभारण्यात आले आहे.
सर्व मतदान केंद्रांवर मतदारांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे व सावलीची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठी विश्रांतीची सोय, महिलांसाठी पाळणाघर तसेच दिव्यांगांसाठी व्हीलचेअर व रॅम्पची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पात्र मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाहीतील आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन श्री. दिघे यांनी केले आहे.