कात्रज-कोंढवा रस्ता भूसंपादनाचा मार्ग मोकळा; महापौर मंजुषा नागपुरे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

Photo of author

By Sandhya

गेल्या ८ वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पाला मिळणार गती; पिसोळीपर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाचा मार्ग सुकर


गेल्या आठ वर्षांपासून रखडलेल्या कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाच्या कामाला आता खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे. या रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाच्या प्रारूप निवाड्यास राज्य शासनाने मंजुरी दिली असून, महसूल विभागाने यासंदर्भातील आदेश मंगळवारी निर्गमित केले आहेत. महापौर मंजुषा दीपक नागपुरे यांनी महापौरपदाची धुरा सांभाळल्यानंतर या विषयाचे गांभीर्य ओळखून महसूलमंत्री श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याकडे केलेल्या आग्रही पाठपुराव्याला हे मोठे यश मिळाले आहे.

महसूल विभागाने दिलेल्या आदेशानुसार, कात्रज येथील राजस सोसायटी ते पिसोळी या दरम्यानच्या ८४ मीटर विकास आराखड्यातील ५० मीटर रुंदीच्या रस्त्यासाठी एकूण ४१ हजार ५१७.७८ चौरस मीटर जागेचे संपादन करण्यात येणार आहे. विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्रस्तावाला शासनाने ‘भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना कायद्या’नुसार अटी व शर्तींसह मंजुरी दिली आहे.

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण लक्षात घेता, हा प्रकल्प मार्गी लावणे शहरासाठी अत्यंत गरजेचे होते. महापौर मंजुषा नागपुरे यांनी या संदर्भात माननीय महसूलमंत्री श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांची भेट घेऊन रखडलेल्या प्रस्तावाबाबत विनंती केली. महापौरांच्या विनंतीची दखल घेत महसूलमंत्र्यांनी तत्काळ प्रशासकीय हालचाली करत या प्रस्तावास ‘हिरवा कंदील’ दाखवला.

“कात्रज-कोंढवा रस्ता हा परिसरातील नागरिकांच्या रोजच्या जगण्याशी आणि सुरक्षेशी निगडित प्रश्न आहे. आम्ही महसूलमंत्री महोदयांना या परिस्थितीची कल्पना दिली आणि त्यांनी जनहिताचा विचार करून आमच्या विनंतीवर तातडीने मान्यता दिली. या निर्णयाबद्दल मी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि महसूलमंत्री श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांचे मनःपूर्वक आभार मानते.”
— मंजुषा दीपक नागपुरे, महापौर.

Leave a Comment

You cannot copy content of this page