

सुभेदार मल्हारराव होळकर यांनी बांधलेल्या वाफगांव येथील भुईकोट किल्ल्यात महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक दिन सोहळा या घराण्याचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी सुरु केला . यावेळीही हा सोहळा ६ जानेवारी रोजी संपन्न झाला .
होळकर संस्थानाने संपूर्ण हिंदुस्थानात अतुल्य पराक्रम करून मोठा दबदबा निर्माण केला होता . अटक वर झेंडे रोवण्यापासून पानिपत, दिल्ली आणि इंग्रज यांच्याविरोधात अफाट पराक्रमाने शत्रूला नामोहरम करण्यात होळकरांचा मोठा वाटा आहे . होळकरांचे मूळ गाव वाफगांव असल्याने येथे त्यांनी हा भव्य असा भुईकोट किल्ला बांधला होता . सद्या शासनाकडून या किल्ल्याच्या संवर्धनाचे काम सुरु असून खोदकाम करताना जुन्या वास्तूंची रचना, पाण्याचे कारंजे, राजदरबार यांचे अवशेष आढळून आले आहेत . होळकर परिवाराच्या वतीने नुकताच येथे प्रतिवर्षाप्रमाणे राज्याभिषेक दिन सोहळा संपन्न करण्यात आला .यावेळी होळकर संस्थानाची नाणी, राजचिन्हे व रक्तदान शिबिर आणि ऐतिहासिक पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते . या कार्यक्रमासाठी भूषणसिंह राजे होळकर, होळकर परिवार, भारतीय लष्करातील काही जेष्ठ अधिकारी, . देशातील ऐतिहासिक घराण्यांचे वंशज, राजकिय, सामाजिक क्षेत्रातील अनेक व्यक्ती, संघटना व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते . त्याचप्रमाणे शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे, सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार , प्रकाश शेंडगे, रमेश शेंडगे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष रमेश थोरात, बाळासाहेब दोलतोंडे आदी मान्यवर उपस्थित होते . ” सर्वांनी गट -तट बाजूला ठेऊन या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी व्हावे ” असे आवाहन यावेळी भूषणसिंह राजे होळकर यांनी केले .