Headlines

राहू येथे विजेच्या धक्क्याने दोन तरुणांचा मृत्यू ;महिला बचावली

यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राहू गावात जनावरांच्या गोठ्याबाहेर कपडे वाळत घालण्यासाठी लावलेल्या लोखंडी तारेला वीजप्रवाह उतरल्याने दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास घडली.
या दुर्घटनेत रोहित अनिल भोइटे (वय २०) आणि ओम नितीन भोइटे (वय १८) यांचा मृत्यू झाला असून सोनाली नितीन भोइटे (वय ४०) या जखमी झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राहू येथील भोइटे यांच्या जनावरांच्या गोठ्याबाहेर कपडे वाळत घालण्यासाठी लावलेल्या लोखंडी तारेला अचानक वीजप्रवाह उतरला. या तारेला स्पर्श झाल्याने रोहित भोइटे, ओम भोइटे आणि सोनाली भोइटे हे तिघेही बेशुद्ध अवस्थेत पडले.
तिघांना तातडीने राहू येथील आरोग्य सेवा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. डॉक्टरांनी सोनाली भोइटे यांच्यावर उपचार करून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. मात्र रोहित आणि ओम यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेतून यवत ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.
यवत ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी सकाळी सुमारे ८ वाजता तपासणी केली असता, रोहित अनिल भोइटे आणि ओम नितीन भोइटे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच यवत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस उपनिरीक्षक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे राहू परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *