
किरण दादा गुजर यांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान; नटराज नाट्य कला मंडळाचा ४० वर्षांचा कलाप्रवास
बारामती : बालकलाकारांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या नटराज नाट्य कला मंडळ, बारामतीच्या वतीने आयोजित चित्रकला व सांस्कृतिक सोहळा यंदा स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भावपूर्ण वातावरणात पार पडला. बारामतीच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत राहिलेले आणि कला क्षेत्राला नेहमीच प्रोत्साहन देणारे स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतींना हा सोहळा समर्पित करण्यात आला.
गेल्या ४० वर्षांपासून नटराज नाट्य कला मंडळाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना कला सादरीकरणाची संधी दिली जात आहे.या चार दशकांच्या प्रवासात अनेक पिढ्यांनी या व्यासपीठावरून आपल्या कलागुणांना आकार दिला आहे. यंदाही बारामती व परिसरातील २० शाळांमधील ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारांत सहभाग नोंदविला.
चित्रकला,गाणी आणि नृत्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली.यंदाच्या कार्यक्रमाला स्व.अजितदादा पवार यांच्या स्मृतींची भावपूर्ण किनार लाभली होती.चित्रांमधून साकारलेला दादांचा प्रवास तसेच गाणी व नृत्यांच्या माध्यमातून त्यांच्या आठवणींना दिलेली उजाळणी उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेली.
‘द बॉम्बे ब्लड’वर आधारित आशय निर्मिती स्पर्धा
यंदाच्या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण दादा गुजर यांच्या संकल्पनेतून टी. सी. कॉलेजच्या डिपार्टमेंट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांसाठी ‘द बॉम्बे ब्लड’ या चित्रपटावर आधारित आशय निर्मिती (Content Creation) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण चित्रपटाचे दिग्दर्शक गौरव ठाकूर यांनी जर्मनीतील ब्रेमेन येथून केले.
या उपक्रमासाठी टी.सी.कॉलेजचे प्राचार्य अविनाश जगताप, संचालक धवल शाह तसेच डिपार्टमेंट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशनचे विभागप्रमुख राहुल चौधरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
किरण दादा गुजर यांच्या हस्ते बक्षीस वितरण
विविध स्पर्धांतील विजेत्या तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण दादा गुजर यांच्या हस्ते करण्यात आले.सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र, तर विजेत्यांना आकर्षक ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
कला,संस्कृती,बालकलाकारांचा उत्साह आणि स्व.अजितदादा पवार यांच्या स्मृतींचा भावपूर्ण संगम असलेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांच्या आठवणींना उजाळा दिला. ४० वर्षांची परंपरा जपत नव्या पिढीतील कलागुणांना व्यासपीठ देणारा हा उपक्रम बारामतीच्या सांस्कृतिक वाटचालीतील महत्त्वाचा अध्याय ठरला.
