विरोधी पक्षांची एकजूट होत आहे यामुळे भाजप ‘पॅनिक’ झाले आहे; पृथ्वीराज चव्हाण

Photo of author

By Sandhya

भाजप ‘पॅनिक’ झाले आहे

पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात “इंडिया’आघाडीच्या माध्यमातून विरोधी पक्षांची एकजूट होत आहे. यात सहभागी पक्षांची संख्या 28 पर्यंत वाढली आहे.

यामुळे भाजप ‘पॅनिक’ झाले आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. कॉंग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये चव्हाण म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार मागील नऊ वर्षांत महागाई कमी करू शकले नाही.

शेतकरी, महिलांचे प्रश्‍न सोडविण्यात ते अपयशी ठरले आहे. संसदेचे विशेष अधिवेशन देशात प्रथमच बोलाविले जात आहे. यात कोणते विषय आणले जाणार, याविषयी कोणतीच माहिती दिली जात नाही.

‘एक देश एक निवडणूक’ हा विषय पुढे आणून विरोधक आणि जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

एकाच वेळी निवडणुका घ्यायच्या असतील, तर सुमारे 35 लाख नवीन ईव्हीएम घ्याव्या लागणार आहे. याचा खर्चही प्रचंड आहे. एकत्रित निवडणुका घेण्यासाठी पाच राज्यांत राष्ट्रपती राजवटही ते लागू करतील.

तसेच लोकसभेच्या चार जागा रिक्त असूनही पोटनिवडणूक घेतली जात नाही. निवडणूक समितीची रचनाही बदलण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे.

तसेच सक्त वसुली संचनालयाच्या (ईडी) प्रमुखांची मुदत संपत असून, त्यांची वर्णी लावण्यासाठी मुख्य चौकशी अधिकारी हे नवीन पद निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment