
रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप, परिसरात तणावाचे वातावरण
लोणी काळभोर : प्लॉटिंगच्या समोर लघुशंका करत असताना हटकल्याने एका टोळक्याने वॉचमनसह त्याच्या पत्नीला दगड व हाताने मारहाण करून हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. ही घटना थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील जय मल्हार हॉटेल जवळ शुक्रवारी (ता.27) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या हाणामारीत जखमी झालेल्या महिलेचा लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये आज बुधवारी (ता.1) दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
शीतल अक्षय चव्हाण (वय-32, रा. चव्हाणवस्ती, थेऊर ता.हवेली) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. सतीश बारीकराव लोखंडे (वय 31, अजय दशरथ मुंढे (वय-26), भानुदास दत्तात्रय शेलार (वय 32 सर्व रा. चिंबळी फाटा, ता खेड, जि पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अक्षय साहेबराव चव्हाण (वय 31) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय चव्हाण हा कुटुंबासोबत थेऊर येथील चव्हाणवस्ती परिसरात राहतो. अक्षय हा थेऊर येथील एका प्लॉटिंगवर वॉचमन म्हणून काम करतो. तर आरोपी हे फॉर्च्युनर गाडीतून चालले होते. दरम्यान, आरोपी हे अक्षय चव्हाण हे काम करीत असलेल्या प्लॉटिंगच्या समोर लघुशंका करीत होते. त्यामुळे अक्षय चव्हाण यांनी त्या सर्वांना हटकले. चिडलेल्या आरोपींन अक्षय चव्हाण व शीतल चव्हाण यांना दगड व हाताने मारहाण करून हवेत गोळीबार केला. त्यानंतर आरोपी गाडीतून केसनंदच्या दिशेने निघून गेले.
या घटनेची माहिती मिळताच, पुणे शहराचे पोलीस उपआयुक्त राजकुमार शिंदे, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी झालेल्या शीतल चव्हाण यांना तत्काळ लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी त्वरित तपासाची सूत्रे हलवून आरोपींच्या मागावर पोलिसांची पथके तयार करून पाठविली. व या घटनेची माहिती लोणी कंद व गुन्हे शाखा यूनिटला दिली.
त्यानंतर गुन्हे शाखा यूनिट 6 चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांनी पोलिसांची पथके तत्काळ लोणी कंद येथे पाठवून दिली. लोणीकंद तपास पथक व र गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने फॉर्च्युनर गाडी अडविली. व गाडीतील आरोपी सतीश लोखंडे, अजय मुंढे व भानुदास शेलार यांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून एक पिस्टल व काही काडतुसे जप्त केली आहे. तर तीन अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले आहेत.
दरम्यान, या हाणामारीत शीतल चव्हाण यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. त्यांना लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शीतल चव्हाण यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर आज मालवली. त्यांचा आज बुधवारी (ता.1) दुपारी उपचारादाम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे थेऊरसह परिसरात शोककळा पसरली आहे.
रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप
मागील पाच दिवसांपासून शीतल चव्हाण यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेव्हा शीतलच्या डोक्याला थोडासा मार लागला होता. मात्र आज बुधवारी दुपारच्या सुमारास शितलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शितल चा मृत्यू हा रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे शितलच्या नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण झाले आहे.
तर या घटनेची माहिती मिळताच, हडपसर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट व त्यांचे शंभर हून अधिक सहकारी रुग्णालयात दाखल झाले असून, रुग्णालय व रुग्णालयाच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. तसेच नातेवाईकांची समजूत काढण्यास पोलिसांनी यश मिळवले आहे.